
धनंजय जोगडे /बीड : शहरातील बसस्थानक परिसरात शुक्रवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून तपास सुरू केला आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत गांधी नगर भागातील नौशाद (वय २५) याचा मृतदेह आढळून आला. सकाळच्या वेळी काही नागरिकांना तरुण बेशुद्ध अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, परिसरात खुनाची चर्चा सुरू असली तरी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

