-नव्या परीक्षेची लवकरच तारीख जाहीर होणार
बीड दि.12 : राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. दहावी नंतर अनेकांनी नीट परीक्षेची तयारी सुरु केली आहे. तर, बारावीच्या परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा (NEET EXAM) देऊन भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, केंद्र सरकारने नीट परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला असून यंदाच्या वर्षी म्हणजेच 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता, ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला असून काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनीही नीट परीक्षेतील पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला होता.
देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी यंदा 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा दिली होती, त्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र, देशभरात 42 तास अगोदरच या पेपरची प्रश्नपत्रिका बाहेर आल्याने पेपर फुटला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून हा परीक्षा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेपरीफुटीमुळे नीटची परीक्षा रद्द करण्यात आली असून सीबीआयमार्फत याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. देशभरात गेल्याच आठवड्यात म्हणजेच 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा घेण्यात आली होती. आता, नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल, त्यासाठी परीक्षार्थींचे परीक्षा केंद्र 3 मे रोजीचेच राहणार असून विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांकडून नव्या परीक्षेसाठी शुल्क घेतले जाणार नाही, मात्र नव्या परीक्षेसाठी नवे ओळखपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थी,पालकांनी फक्त एनटीएच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केंद्राकडून करण्यात आले आहे.
22 लाख विद्यार्थ्यांचा विश्वास तुटला-राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधींनीही नीट 2026 च्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याबद्दल ट्विट केलं होतं. ही आता परीक्षा राहिलेली नाही, नीट आता एक लिलाव बनला आहे. परीक्षेच्या तब्बल 42 तास आधीच अनेक प्रश्न व्हॉट्सअॅपला विकले जात होते. 22 लाखांहून अधिक मुलांनी वर्षभर रात्रंदिवस जागून अभ्यास केला, आपल्या भविष्यासाठी झटले, आणि एका रात्रीत त्यांच्या भविष्यास खुलेआम बाजारात लिलावाला ठेवण्यात आले. ही पहिली वेळ नाही. गेल्या 10 वर्षांत 89 पेपर लीक झाले असून 48 वेळा पुन्हा परीक्षा घ्यावी लागली आहे. प्रत्येक वेळी तीच आश्वासने, आणि नंतर तीच शांतता, अशा शब्दात राहुल गांधींनी नीट पेपरफुटीवरुन संताप व्यक्त केला होता. मोदीजी, जेव्हा प्रत्येक अपयशाचे बिल तुम्ही जनतेच्या माथी मारता, तेव्हा त्या बिलामध्ये गरीबांच्या मुलांचे भविष्यही सामावलेले असते. 22 लाख विद्यार्थ्यांचा विश्वास तुटला आहे, भारताच्या तरुणांच्या स्वप्नांसाठी मोदी सरकारपेक्षा दुसरा मोठा धोका नाही. मी भारताच्या तरुणांसोबत उभा आहे. हा काळ अत्यंत कठीण आहे, मला याची जाणीव आहे. पण, ही व्यवस्था कायम अशी राहणार नाही. आपण सगळे मिळून ती बदलू, असेही राहुल गांधींनी म्हटलं होतं.
पैशांचा मोठा खेळ झाला-आ.रोहित पवार
281 प्रश्न असलेल्या गेज पेपरमधील 131 प्रश्न जसेच्या तसे नीटच्या प्रश्नपत्रिकेत येत असतील तर 2024 प्रमाणे यंदा देखील परीक्षेत पैशांचा मोठा खेळ झाला हे स्पष्ट आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात देखील असाच प्रकार एसआरपीएफ परीक्षेच्या संदर्भात देखील झाला होता. ठराविक दलालांच्या पैशाच्या खेळात विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करून त्यांच्या आयुष्याचा खेळ करणं योग्य नाही. तपास यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाई करावी, ही विनंती, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार म्हणाले.


