बीड दि.25 : बीड जिल्हा पोलीस दलातील पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी रविवारी (दि.24) काढले.
बदली प्रक्रियेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विनंती अर्जांचा विचार करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. या बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांची बीड शहर ठाण्यातून केज पोलीस ठाण्यात, पोलिस निरीक्षक विनोद घोळवे यांची पाटोदा पोलीस ठाण्यातून बीड शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांची नियंत्रण कक्षातून वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांची शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तसेच पोलिस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांची होम डीवायएसपी पदावरून पाटोदा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. याशिवाय पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांची केज येथून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक संदीप मांजर्मे यांची केज येथून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र घुगे यांची अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यातून धारूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तसेच पोलिस उपनिरीक्षक रमेश घुले यांची बर्दापूर येथून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रमुख बदल्यांव्यतिरिक्त तब्बल ३२ सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक यांच्या प्रशासकीय बदल्याही करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीस दलातील कामकाज अधिक गतिमान व प्रभावी करण्याच्या उद्देशाने या बदल्या करण्यात आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

