– फारूख पटेल, अमर नाईकवाडे, विनोद मुळूक यांच्यासह 11 जणांचा एक, तर निजाम आणि मुजीब यांचा दुसरा गट
सिद्दीख इनामदार । बीड
दि.28 : बीड नगर पालिकेत अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी मिळून उपनगराध्यक्षपदी विनोद मुळूक यांना बसवल्यानंतर आता सहाच महिन्यात या आघाडीची बिघाडी झाली आहे. यापुर्वी रस्ते कामासाठी आलेले 22 कोटी रुपये पचवल्यानंतर आता स्वच्छता आणि पाणीपुरवठ्यासाठी आलेले 48 कोटी रुपये पचवण्यासाठी सगळ्याच नगरसेवकांमध्ये जंगी फाईट सुरू आहे. याच फाईटचा एक नमूना काल सभागृहात पहायला मिळाला. अजित पवार गटाचे गटनेते फारूक पटेल यांनी आमचं विजयसिंह पंडितांबरोबर भांडण नाही, परंतु चमच्यांसोबत आमचं जमत नाही, चमचे जास्त वाजत आहेत, असं म्हणून त्यांच्याच गटाचे स्वच्छता सभापती शेख निजाम यांना चिमटा काढला. त्यानंतर 19 नगरसेवकांच्या या गटाचे खरोखरीच तीन तुकडे झाल्याचे स्पष्ट झाले.

स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याच्या कामासाठी आलेले 48 कोटी रुपयांची कामे सगळ्या नगरसेवकांना वाटून द्या, अशी भुमिका नगरसेवकांनी मांडली आहे. मात्र या भुमिकेला स्वच्छता सभापती शेख निजाम आणि नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब यांचा विरोध आहे. त्यांच्या मते 48 कोटीच्या कामाची टेंडर प्रक्रिया राज्यस्तरीय व्हावी. पण याच राज्यस्तरीय ओपन टेंडरमुळे स्थानिक नगरसेवकांना त्यांच्या गल्लीत, त्यांच्या संस्थेमार्फत कामे करता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण दुसरीकडे ओपन टेंडर झाल्यामुळे कोणत्याही एकाच गुत्तेदाराला हे 48 कोटींची कामे मिळणार आहेत. या 48 कोटीत आमदार विजयसिंह पंडित, नगराध्यक्ष प्रतिनिधी मुजीब शेख आणि स्वच्छता सभापती निजाम शेख यांना त्यांचा जीएसटी बिनबोभाट मिळू शकतो. मग अशावेळी इतर नगरसेवकांचे काय? असा मुख्य प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. त्यामुळे अजित पवार गटाचे गटनेते फारूक पटेल यांच्या नेतृत्वात अमर नाईकवाडे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, अश्पाक इनामदार, मीना गोडसे, आरती बनसोडे, भैय्या मोरे, मुजाहेद पटेल, प्रमोद शिंदे, नुसरत आरा आदींनी एकत्रित येत बंडाचं निशाण फडकावलं आहे. तर नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांच्यावतीने मुजीब शेख, स्वच्छता सभापती निजाम शेख यांनी वेगळा गट तयार केलाय. हे सगळे दोघेही आ. विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वात काम करत आहेत. तर दुसराही गट तुर्तासतरी आ. पंडित यांचंच नेतृत्व सांगत आहे. पण हा गट भाजपाच्या गटनेत्या डॉ. सारीका क्षीरसागर आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याही संपर्कात असल्याचे समजते.
आ. पंडितांच्या नाकीनऊ
विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वात 19 नगरसेवक आहेत. परंतु सध्या केवळ मुजीब शेख आणि शेख निजाम हे दोघेच पंडितांच्या नेतृत्वात काम करताना दिसतात. बाकी नगरसेवक आता आमदार संदीप क्षीरसागर यांच्या संपर्कात आलेले आहेत. तर काहींनी डॉ. सारिका क्षीरसागर यांच्याकडे देखील फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे हे नगरसेवक सांभाळताना सहाच महिन्यात आ. पंडित यांच्या नाकीनऊ आले आहेत.
बैठकीत विविध विषयावर चर्चा
नगरपालिकेच्या तीन दिवस चाललेल्या सर्वसाधारण सभेत शहराच्या विविध प्रश्नांवर ठराव मंजूर करण्यात आले असले, तरी ही सभा मुख्यत्वे प्रचंड गोंधळ, राजकीय टोमणे आणि सत्ताधारी पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळेच अधिक गाजली. तीन दिवस चाललेल्या या सभेत कर्मचार्यांचा वैद्यकीय परतावा, मलेरिया विभागातील 18 कर्मचार्यांना पुन्हा सेवेत घेणे, अनुकंपा भरती प्रक्रिया लवकर पूर्ण करणे आणि शहरात आवश्यकतेनुसार नवीन जलकुंभ उभारणे यांसारखे महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. याशिवाय कोरोना काळातील जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे आणि 15 व्या वित्त आयोगाच्या निधीबाबत विशेष सभा आयोजित करण्यावरही सविस्तर चर्चा झाली. या सभेत विकासाच्या मुद्द्यांपेक्षा सभेतील राजकीय वादच जास्त चर्चेत राहिला. या सभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अंतर्गत गटबाजी उघडपणे चव्हाट्यावर आली. गटनेते फारूक पटेल, अमर नाईकवाडे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत आपल्याच पक्षाचे स्वच्छता सभापती निजाम शेख यांच्यावर थेट निशाणा साधला. दुसरीकडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गटनेते खुर्शीद आलम यांनीही विविध मुद्द्यांवरून प्रशासनाला आणि सत्ताधार्यांना धारेवर धरत अनेक प्रश्न उपस्थित केले. विरोधी पक्ष भाजपच्या गटनेत्या डॉ. सारिका क्षीरसागर यांनी शहरातील नागरी समस्या मांडत सभेत आलेल्या विविध विकास ठरावांना अनुमोदन दिले.
नगराध्यक्षांचे मौन…!
तीन दिवसांच्या या संपूर्ण प्रवासात नगरपालिकेतील राजकीय वातावरण अत्यंत तापलेले पाहायला मिळाले. घरी बसून घेतलेले ठराव, एकमेकांविरुद्ध झालेला एकेरी भाषेचा वापर, कोपरखिळ्या आणि राजकीय टोमण्यांनीच सभेचा नूर घालवला. विशेष म्हणजे, या संपूर्ण गोंधळात अध्यक्षा प्रेमलता पारवे यांनी केवळ ऐकून घेण्याचीच भूमिका बजावली. नगरपालिकेचे उपाध्यक्ष विनोद मुळूक यांनीच पुढाकार घेत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि इतर मुद्द्यांवर भाष्य केले. काही सदस्यांनी अध्यक्षांनीच उत्तर द्यावे असा आग्रह धरत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र अध्यक्षांच्या मौनामुळे त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला.

