बीड जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; सिझेरियननंतर दोन दिवसांत प्रकृती बिघडली
प्रतिनिधी। बीड
दि.18 ः बाळंतपणासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या 19 वर्षीय महिलेच्या सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर तिच्या पोटात हातमोजे आणि रुमाल राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन दिवसांत महिलेची प्रकृती बिघडली. पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या पोटात संसर्ग होऊन आतडे सडल्याचे आणि गर्भाशय खराब झाल्याचे निदर्शनास आल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. अखेर शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढावे लागले असून, संबंधित डॉक्टर व कर्मचार्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
वडवणी तालुक्यातील संध्या सुरज गायकवाड (वय 19) हिला बाळंतपणासाठी 1 ऑगस्ट रोजी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी सायंकाळी सुमारे 7.20 वाजता तिच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. घरी गेल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच संध्याला पोटात तीव्र वेदना, उलट्या आणि ताप येऊ लागला. त्यामुळे नातेवाईकांनी तिला वडवणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करून तपासणी व उपचार केले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला बीडमधील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. प्रकृती गंभीर होत असल्याने आणि उपचाराचा खर्च मोठा असल्याने नातेवाईकांनी 9 ऑगस्ट रोजी तिला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेले. तेथील खर्च परवडत नसल्याने दुसर्याच दिवशी 10 ऑगस्ट रोजी तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ससून रुग्णालयात करण्यात आलेल्या तपासण्यांनंतर पोटात मोठ्या प्रमाणात संसर्ग आणि पू झाल्याचे तसेच आतड्यांना गंभीर इजा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचा नातेवाईकांचा दावा आहे. सिझेरियनच्या वेळी पोटात हातमोजे व रुमाल राहिल्यामुळे हा संसर्ग झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. परिस्थिती गंभीर झाल्याने संध्यावर दोन वेळा मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात खराब झालेले आतडे आणि गर्भाशय काढावे लागल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी संध्याच्या नातेवाईकांनी 18 ऑगस्ट रोजी बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित डॉक्टर व कर्मचार्यांच्या निष्काळजीपणाची चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कोट –
माझ्या 19 वर्षांच्या मुलीला बाळंतपणासाठी विश्वासाने जिल्हा रुग्णालयात आणले होते. मात्र, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तिच्या पोटात हातमोजे आणि रुमाल राहिल्याचा आम्हाला सांगण्यात आले. यामुळे तिचे आतडे सडले आणि गर्भाशय काढावे लागले. आज माझी मुलगी पुण्यात उपचार घेत असून तिची प्रकृती गंभीर आहे. या प्रकाराला जबाबदार असणार्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी.
– शिला सुखदेव उजगरे, संध्याची आई, वडवणी
कोट –
या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून ज्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली होती, त्यांच्या चौकशीचा प्रस्ताव उपसंचालकांकडे पाठवला
आहे.
-सतीशकुमार सोळंके, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
————


