VIVEK JOHNSAN

खबरदार! राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई

बीड


-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा अधिकारी, कर्मचार्‍यांना स्पष्ट इशारा


प्रतिनिधी । बीड
दि.6 ः महसूल विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपल्या शासकीय सेवेशी संबंधित कोणत्याही बाबतीत वरिष्ठ अधिकार्‍यांवर राजकीय अथवा इतर कोणत्याही प्रकारचा बाह्य दबाव आणू नये. तसेच राजकीय नेते, पदाधिकारी किंवा इतर व्यक्तींच्या माध्यमातून शिफारस अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित अधिकारी-कर्मचार्‍यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिला आहे.

बीड जिल्हा महसूल आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी जिल्हाधिकार्‍यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियम 23 नुसार कोणताही शासकीय कर्मचारी आपल्या शासकीय सेवेशी संबंधित बाबतीत वरिष्ठ प्राधिकरणावर कोणताही राजकीय अथवा इतर बाह्य दबाव आणणार नाही किंवा तसा प्रयत्न करणार नाही, अशी तरतूद आहे. शासनाच्या 17 ऑगस्ट 2006 आणि 29 डिसेंबर 2017 रोजीच्या परिपत्रकांमध्येही या नियमांचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. अधिकारी-कर्मचार्‍यांविरुद्ध त्यांच्या सेवेसंदर्भात राजकीय किंवा इतर बाह्य व्यक्तींकडून पत्रव्यवहार अथवा शिफारस प्राप्त झाल्यास, संबंधित अधिकारी-कर्मचार्‍याने त्याचा स्वतःशी संबंध नसल्याचे स्पष्ट करून सक्षम प्राधिकार्‍याला कळविणे अपेक्षित आहे. अन्यथा संबंधित पत्रव्यवहारास किंवा कृतीस संबंधित अधिकारी-कर्मचार्‍याची अप्रत्यक्ष अथवा मूकसंमती असल्याचे गृहीत धरून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 नुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील महसूल विभागातील कोणत्याही संवर्गातील अधिकारी किंवा कर्मचार्‍याने सेवेसंबंधीच्या बाबतीत वरिष्ठ अधिकार्‍यांवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे राजकीय किंवा इतर बाह्य दबाव आणल्यास त्याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे. दरम्यान, हे परिपत्रक सर्व कार्यालयप्रमुख व महसूल शाखेच्या प्रमुखांनी आपल्या अधिनस्त अधिकारी-कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आणून द्यावे, असेही जिल्हाधिकार्‍यांनी निर्देशित केले आहे.

Tagged