सरकार विरोधात समर्थकांचा आक्रोश, पाडळसिंगीत रास्तारोको
बीड दि.7 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाची प्रशासनाने दखल घ्यावी, या मागणीसाठी त्यांच्या समर्थकांनी सोमवारी रात्री धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाडळसिंगी परिसरात रास्तारोको आंदोलन केले. आंदोलकांनी महामार्गावर टायर जाळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली. पाडळसिंगी परिसरात मोठ्या संख्येने समर्थक रस्त्यावर उतरले. यावेळी महामार्गावर टायर पेटवून वाहतूक रोखण्यात आली. रास्तारोकोमुळे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची तातडीने दखल घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली जात आहे.


