प्रतिनिधी : बीड
दि. 29 : मोतीबिंदू झाल्याने कमजोर झालेली दृष्टी पुन्हा निट व्हावी म्हणून शस्त्रक्रीया करण्यात आल्या. मात्र, शस्त्रक्रीयेनंतर चार रुग्णांच्या डोळ्यांना संसर्ग झाल्याने या रुग्णांची दृष्टी कमजोर झाली आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. आता या रुग्णांवर जालना येथे उपचार करण्यात येत आहेत. ‘सेरेशिया मार्सेसेन्स’ या जिवाणूचा संसर्ग झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 17 ऑक्टोबरला 25 नेत्रशस्त्रक्रीया करण्यात आल्या. यामध्ये मोतीबिंदूच्या 22 शस्त्रक्रियांचाही समावेश आहे. शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी यापैकी 4 रुग्णांना डोळ्यांचा त्रास जाणवू लागल्याने पुन्हा या रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले. मात्र संध्याकाळपर्यंत हा त्रास वाढतच गेल्याने रुग्णांची तपासणी व उपचारासाठी लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ नेत्रचिकित्सकांना बोलविण्यात आले. त्यांच्या सल्ल्यानुसार आणि पुढील उपचारांसाठी या चारही रुग्णांना जालना येथील गणपती नेत्रालयात हलवण्यात आले. तिथे 25 तारखेपर्यंत त्यांच्यावर उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली. या रुग्णांमध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. रुग्णांच्या डोळ्यांतील सॅम्पलच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय तपासणीत ‘सेरेशिया मार्सेसेन्स’ नावाचा अत्यंत दुर्मिळ जिवाणू आढळून आल्याचे नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. ज्ञानोबा दराडे म्हणाले. तर, शस्त्रक्रियेदिवशी ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित सर्व डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांचे नेझल स्वॅब तपासणीत हा जिवाणू त्यांच्यामध्ये किंवा शस्त्रक्रियागृहात कुठेही आढळलेला नाही. त्यामुळे हा संसर्ग नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे कळणे अवघड आहे.
दरम्यान, याबाबत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांना विचारले असता, दरदिवसाआड शस्त्रक्रीयागृहाचे निर्जंतुकीकरण केले जाते. रुग्णांमध्ये हायपरटेंशन, शुगर असे आजार असतील तर प्रतिकारशक्ती कमी असण्यामुळेही असे होऊ शकते, असे ते म्हणाले. शस्त्रक्रीयांवेळी विभाग प्रमुखांसह वरिष्ठ तज्ज्ञ उपस्थित होते, असे डॉ. धपाटे म्हणाले. मात्र, रुग्णांचे डोळे वाचवण्यात यश आल्याचे त्यांनी सांगीतले. कान – नाक – घसा विभाग प्रमुख डॉ. हिप्परगेकर यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करत असल्याचेही डॉ. शंकर धपाटे म्हणाले. दरम्यान, काही वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयात असा प्रकार घडला होता.

