vikram kale

विक्रम काळे कुठंयत? त्यांनी सतीश चव्हाणांचा निकाल बघितलाय का?

बीड

बालाजी मारगुडे । बीड

वर्षानुवर्षे सत्तेच्या वर्तुळात वावरणार्‍या नेत्यांच्या पायाखालची वाळू कशी सरकत आहे, याची जाणीव कालच्या निवडणूक निकालाने करून दिली. सतीश चव्हाण satish chavhan यांचा झालेला पराभव केवळ त्यांचा पराभव नव्हता, तर तो प्रदीर्घकाळ सत्तेत राहूनही जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीविरुद्धचा रोष होता. याच निकालाचे पडसाद आता मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या आमदार विक्रम काळे vikram kale यांच्याभोवती उमटू लागले आहेत. सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा आणि शिक्षकांमध्ये खदखदणारा रोष पाहता, पुढचा नंबर कुणाचा? या प्रश्नाचे उत्तर आता विक्रम काळे यांच्या दिशेने बोट दाखवू लागले आहे. लोक सोशल मीडियावरून थेट विचारत आहेत ‘सच’ खरा करून दाखवला आता शिक्षकांना ‘विका’ (विक्रम काळे) चा कार्यक्रम लावायचा आहे.


आमदार विक्रम काळे यांचा राजकीय प्रवास कर्तृत्वातून नव्हे तर वारशातून उभा राहीलाय. त्यांचे वडील स्व. वसंतराव काळे यांच्या पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीमुळे या कुटुंबाला मराठवाड्यात मोठा चाहतावर्ग लाभला होता. सन 1996-97 मधील पोटनिवडणुकीपासून सुरू झालेला हा राजकीय प्रवास पुढे 2007-08 मधील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने विक्रम काळे यांच्याकडे आला. तेव्हापासून आजतागायत सलग चार वेळा शिक्षक मतदारसंघातून विजय मिळवून त्यांनी राजकीय डाव मारले असले, तरी या दोन दशकांच्या प्रदीर्घ काळात त्यांनी शिक्षकांच्या पदरी काय पाडले, हा कळीचा मुद्दा ठरत आहे. सलग वीस ते बावीस वर्षे आमदार पद भूषवूनही पक्षासाठी आणि विशेषतः शिक्षकांसाठी त्यांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे, अशी भावना आज शिक्षक वर्गात तीव्रतेने व्यक्त होत आहे.


शिक्षकांचे प्रश्न आज एरणीवर आले आहेत. जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न असो, टप्पा अनुदानाची अंमलबजावणी असो किंवा तासिका तत्त्वावर गेली 10-12 वर्षे जिवाचे रान करून काम करणार्‍या प्राध्यापकांचे भवितव्य असो, हे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करणे अपेक्षित असते. परंतु, अशा गंभीर प्रश्नांवर अधिकारी आणि मंत्र्यांच्या बैठकांमधील समन्वय डिस्कनेक्ट करण्यात आमदार काळे आघाडीवर राहील्याचा स्पष्ट आरोप शिक्षक वर्ग करत आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेऊन गोड बोलणे, त्यांचा प्रश्न आत्मीयतेने ऐकून घेणे आणि तो प्रश्न तसाच जिवंत ठेवून त्यावर आपलं राजकारण करणे ही त्यांची कार्यशैली राहिली. मतदारसंघातील आठ जिल्ह्यांमध्ये त्यांचा वावर केवळ वरिष्ठ नेत्यांच्या दौर्‍यापुरता किंवा मोजक्या समारंभापुरता मर्यादित राहिला आहे, असा जनक्षोभ आज समोर येत आहे.


विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक वर्गाने आपल्या दीर्घकाळच्या अस्वस्थतेचा रोष दाखवून दिला. सतीश चव्हाण यांच्या पराभवात शिक्षक मतदारांची भूमिका आणि अप्रत्यक्षपणे विक्रम काळे यांच्या कार्यपद्धतीबद्दलची नाराजी महत्त्वाची ठरली, असे मानण्यास वाव आहे. आगामी 2029 मध्ये होणार्‍या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला अजून तीन वर्षांचा अवधी शिल्लक असला, तरी सध्याची राजकीय हवा पाहता परिस्थिती काळे यांच्या बाजूने अजिबात नाही. जे नेते गेल्या बावीस वर्षांत शिक्षकांसाठी ठोस काही करू शकले नाहीत, ते या उरलेल्या तीन वर्षांत चमत्कार करतील, अशी कोणतीही अपेक्षा आज सुशिक्षित मतदार बाळगून नाही. मिळालेल्या आमदार निधीचा योग्य उपयोग शाळा आणि शैक्षणिक विकासासाठी न झाल्याचा संतापही शिक्षक व्यक्त करत आहेत.


आजचे राजकारण बदलले आहे. मतदार सुजाण झाला आहे आणि नोकरदार वर्ग प्रत्येक राजकीय हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहे. सतीश चव्हाण यांच्या पराभवाने प्रस्थापितांच्या पायाखालची जमीन सरकवली असून, आता विक्रम काळे यांच्यासमोरही आत्मपरीक्षणाची मोठी वेळ आली आहे. केवळ कौटुंबिक वारसा किंवा जुन्या ओळखीच्या बळावर निवडणुका जिंकण्याचे दिवस आता मागे पडत चालले आहेत. जर या उर्वरित काळात शिक्षकांच्या प्रश्नांवर ठोस काम उभे राहिले नाही, तर आगामी निवडणुकीत मतदारांचा हाच रोष मतपेटीतून स्पष्टपणे बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. प्रस्थापितांना धडा शिकवण्याची ही नवी राजकीय संस्कृती राजकारण्यांना डोळे उघडणारी ठरणार आहे.



Tagged