ZP ELECTION झेडपी निवडणुक : परळी सोडता जिल्ह्यात महायुती अशक्यच; राष्ट्रवादी शप वगळता काँग्रेस, दोन्ही शिवसेनांची कसरत

बीड

  • दत्ता देशमुख : बीड
  • दि. 31 : सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या (दि. 29) आदेशामुळे जिल्हा परिषद निवडणुका होणार हे निश्चित झाले आहे. कधी होणार याचा मुहूर्त नसला तरी आता समाज माध्यमांतून तयारी करणार्‍यांनी दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, होणार्‍या जिल्हा परिषद निवडणुकीत राज्यात महायुती असली तरी जिल्ह्यात हे तिन पक्ष एकत्र लढणे मतदार संघांतील समिकरणांमुळे कठीण आहे. तर, महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वगळता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) आणि काँग्रेसला खुप दंड बैठका माराव्या लागणार आहेत. हीच गत सत्तेमधील शिवसेनेचीही आहे. दरम्यान, मुंडे भावंडांच्या एकिकरणामुळे परळीत भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रच लढेल, यात शंका नाही.

  • कोव्हिड संसर्ग, दुष्काळ, ओबीसी आरक्षणांच्या कारणांनी पावणे पाच वर्षांपासून लांबलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने याबाबत आदेश देताच मागच्या काळात तयारी करुन थकलेले नेते लागलीच शुक्रवार पासून दंड थोपटून समाज माध्यमांच्या मैदानात उतरले आहेत. आता मागच्या वर्षी झालेली प्रभाग रचना, वर्षभरापूर्वी निघालेली गट व गणांची आरक्षण सोडत कायम राहणार का, आणि निवडणुका कधी होणार याबाबत पूर्णत: संभ्रम असला तरी निवडणुक होणार म्हणून पुन्हा सर्कलनिहाय तयार्‍यांना जोर आला आहे. दरम्यान, मागच्या जिल्हा परिषदेत 60 सदस्य तर पंचायत समित्यांमध्ये 120 सदस्य होते. मागच्या वर्षीच्या प्रभाग रचनेत केज तालुक्यात येवता या नव्याने एका गटाची व दोन गणांची भर पडून गटांची संख्या 61 तर गणांची संख्या 122 झाली आहे.

  • प्रत्येक मतदार संघात त्रांगडे; निवडणुकीत युती अवघड
  • जिल्ह्यात आघाडीपेक्षा महायुतीची ताकद अधिक आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके, धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित हे तीन आमदार आणि पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवारांकडेच पालकमंत्रीपद आहे. तर, भाजपचे सुरेश धस, नमिता मुंदडा हे दोन आमदार आणि पंकजा मुंडे मंत्री आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मतदार संघनिहाय विचार केला तर परळीत युती शक्य आहे. भावंडे म्हणून पंकजा मुंडे व धनंजय मुंडे एकत्र आल्याने नगर परिषदे प्रमाणे जिल्हा परिषदेलाही या मतदार संघात भाजप – राष्ट्रवादी काँग्रेसची युती शक्य आहे. शिवसेनेलाही सोबत घेतले जाऊ शकते. केजमध्ये आमदार नमिता मुंदडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश आडसकर यांच्यात युतीची शक्यता अधिक असली तरी शिवसेनेच्या माजी आमदार संगीता ठोंबरे व डॉ. प्रतिभा थोरात स्वतंत्र लढू शकतात. बीडमध्ये आमदार विजयसिंह पंडित व भाजपचे डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यात युती अशक्य मानली जाते. आष्टीत मुळात आमदार सुरेश धस आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्यात युती अशक्य आहे. त्यात या मतदार संघातील पंकजा मुंडे समर्थक आणि धोंडे समर्थकांच्या उमेदवारीचा पेचही उभारणार आहे. गेवराईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व अमरसिंह पंडित यांच्याकडे असेल. त्यामुळे भाजपचे माजी मंत्री बदामराव पंडित व बाळराजे पवार युती करणे अगदीच दुरापस्त आहे. माजलगावमध्येही आमदार प्रकाश सोळंके तसेच भाजपचे डॉ. ओमप्रकाश शेटे, माधव निर्मळ आदी नेत्यांचे सुत्रपात्र जमत नाही.

  • राष्ट्रवादी शप वगळता कॉँग्रेस, दोन्ही शिवसेनांची कसरत
  • जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे खासदार तर बीडमधून संदीप क्षीरसागर आमदार आहेत. श्री. सोनवणेंमुळे केज मतदार संघात तर श्री. क्षीरसागर यांच्यामुळे बीड मतदार संघात पक्षाचे चांगले संघटन व कार्यकर्ते आहेत. तर, माजलगाव मतदार संघातही मोहन जगताप यांच्यामुळे पक्षाची ताकद आहे. आष्टी पक्षाच्या युवा आघाडीचे महेबुब शेख यांचे होमग्राऊंड असले तरी निवडणुकीसाठी त्यांनाही संघटन वाढविण्याची गरज आहे. परळीत राजाभाऊ फड यांच्यावर पक्षाची भिस्त आहे. आता आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) तसेच सत्तेतल्या शिवसेनेलाही निवडणुकीपुर्वी मोठ्या प्रमाणावर दंड बैठका माराव्या लागणार आहेत. अनिल जगताप, सचिन मुळूक, चंद्रकांत नवले, स्वप्नील गलधर असे शिवसेनेला चार जिल्हा प्रमुख आहेत. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी या पक्षालाही संघटन वाढवण्याची गरज आहे.
Tagged