acb office beed

कारमध्ये लाच स्वीकारली, एसीबीच्या सापळ्याचा संशय येताच पोलीस फरार!

बीड

गेवराईतील प्रकार; बीड एसीबीकडून गुन्हा दाखल

केशव कदम

बीड दि.26 : चोरीस गेलेली स्विफ्ट कार शोधून मिळाल्यानंतर ती तक्रारदाराच्या ताब्यात देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या गेवराई पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदाराने गुरुवारी (दि.२६) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यादरम्यान कारमध्येच लाच स्वीकारली. मात्र, सापळ्याचा संशय येताच त्याने कार पळवून घटनास्थळावरून धूम ठोकली. पांडुरंग उत्तम दराडे असे फरार पोलीस अंमलदाराचे नाव असून, त्याच्याविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराची स्विफ्ट कार चोरीस गेली होती. ही कार सापडल्यानंतर ती परत देण्याच्या मोबदल्यात पोलीस अंमलदार पांडुरंग दराडे याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवारी बीड एसीबीच्या पथकाने गेवराई पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. दरम्यान, दराडे हा पोलीस ठाण्याच्या आवारात कारमध्ये बसलेला असताना त्याने कारमध्येच लाचेची रक्कम स्वीकारली. मात्र, एसीबीच्या पथकाने सापळा रचल्याचा संशय येताच त्याने कारसह तेथून पलायन केले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार बिडकर, सुरवसे, पुरी आणि खरसाडे यांनी ही कारवाई केली. फरार पोलीस अंमलदार दराडे याचा शोध सुरू आहे.

Tagged