न्यूज ऑफ द डे

एकीकडे राजकीय उलथापालथ, दुसरीकडे महाराष्ट्रातील आमदाराचा साखरपुढा

By Karyarambh Team

June 29, 2022

औरंगाबाद, दि.29 : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असतानाच मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी कुठलाही गाजावाजा न करता एका कौटुंबिक सोहळ्यात साखरपुडा आटोपला. लवकरच ते विवाह बंधनात अडकणार आहेत.

भुयार यांनी मोर्शी मतदारसंघात तत्कालीन कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा पराभव केल्याने ते राज्यभरात चर्चेत आले. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते एकमेव आमदार होते. पक्षसंघटनेत विशेष लक्ष देत नसल्याच्या कारणावरून राजू शेट्टी यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. यादरम्यान, भुयार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक साधली. राज्यसभा निवडणुकीत त्यांच्या मतदानाबाबत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आक्षेप व्यक्त केला असताना आपण अजित पवारांशी प्रामाणिक आहोत, असे सांगून भुयार यांनी खासदार राऊत यांनादेखील सडेतोड उत्तर दिले होते. आमदार भुयार यांचा साखरपुडा नुकताच आटोपला असून लवकरच त्यांच्या लग्नाचा मुहूर्त ते जाहीर करणार आहेत. राज्यात सध्या राजकीय अस्थिरता असली तरी भुयार यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नवा जोडीदार लाभला आहे.