अंबाजोगाई

बनावट दारूचा कारखाना उद्धवस्त

By Shubham Khade

July 08, 2022

पो.नि.वासुदेव मोरे यांची वरपगावजवळ कारवाई; 5 लाखांहून अधिक मुद्देमाल

अंबाजोगाई : एका फार्म हाऊसमध्ये सुरु असलेला बनावट दारूचा कारखाना अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी उद्धवस्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि.8) पार पडली. यात 5 लाखांहून अधिक मुद्देमाल सापडला आहे. तर तिघांना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे.

  सतीश श्रीलालचंद हेला (वय 20), हरिओमकुमार श्रीबळीलाल सरोज (वय 19, दोघे रा.चकअहमदीपूर ता.मंझनपूर जि. कौशांबी), संतोषकुमार श्रीदशरथ सरोज (वय 25, रा.पवईया ता.मंझनपूर जि. कौशांबी) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे हे तिघे उत्तरप्रदेशातील असून स्थानिकाच्या मदतीने दारू निमिर्तीचा कारखाना चालवत होते. वरपगाव शिवारात एका फार्म हाऊसमध्ये बनावट दारू निर्मिती होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीआधारे ग्रामीण पोलिसांनी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास छापा मारला. यावेळी त्याठिकाणाहून 3 लाखांची बनावट दारू, 20 पोते रिकाम्या बाटल्या, दोन कॅन रयासन, 3 ड्रम, पॅकिंगसाठी वापरली जाणारी मशीन व तत्सम साहित्य, बनावट लेबल, पाणी उपशासाठीचा विद्यूत पंप असा एकूण मुद्देमाल 5 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले. त्याठिकाणाहून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार असल्याची पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक विट्ठल केंद्रे, पोलीस शिपाई स्वप्नील शिनगारे, महेश भागवत, बापूराव राऊत, कुलदीप खंदारे, बाळकृष्ण मुंडे, अनिल मिसाळ, मपोशि.मनिषा चाटे, चालक कमलाकर गायकवाड आदींनी केली.

आरोपी परप्रांतीय, पोलिसांकडे नोंद नाही?तिघे आरोपी हे किशोरवयीन असून उत्तरप्रदेशातील असल्याची माहिती आहे. हे तिघे कोणत्या स्थानिकाच्या मदतीने दारू तयार करत होते, याचा पोलीस शोध घेत आहेत. परप्रांतीय लोक वास्तव्यास असल्याची माहिती स्थानिकाने पोलिसांकडे नोंदविणे अपेक्षित असते. परंतु, पोलिसांकडे नोंद नसण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून याबाबत तपासणी सुरु आहे.

फार्म हाऊस कोणाच्या जागेत?पोलिसांनी छापा मारला ती जागा कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. सदरील जागा एका व्यक्तीच्या नावे व वापर इतरांकडून होत असल्याचे तपासात समोर येऊ शकते. एका बड्या व्यक्तीची जागा असण्याची शक्यता आहे.