क्राईम

सुकळी येथील नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू

By Karyarambh Team

August 10, 2022

घातपाताचा नातेवाईकांचा आरोप; सिरसाळा पोलिसांची गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

माजलगाव- तालुक्यातील उमरी माहेर असलेल्या नवविवाहितेचा रविवारी (दि.७) विहिरीत पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना सिरसाळाजवळ (ता.धारूर) असलेल्या सुकळी येथे घडली होती. या नवविवाहितेचा पाय घसरून मृत्यू झाला नसून तो घातपात झाला असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. तरीही सिरसाळा पोलीस मुलीच्या सासरच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

मयत नवविवाहिता

तालुक्यातील उमरी येथील भीमराव लांडगे यांची मुलगी राणीचा विवाह तीन महिन्यापूर्वी सुकळी येथील गणेश राऊत याच्याशी सोबत झाला होता. रविवारी (दि.७) विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या नवविवाहित राणीचा मृत्यू झाल्याची बातमी नातेवाईकांना कळताच नातेवाईकांना धक्का बसला आपल्या मुलीचा पाय घसरून मृत्यू झाला नसून तो सासरच्या लोकांनी घातपात केल्याचा आरोप मुलीचे वडील भीमराव लांडगे यांनी केला आहे. रविवारी शवविच्छेदन करुन सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आला. अंत्यसंस्कार केल्यानंतर माहेरच्या लोकांनी सिरसाळा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत सासरच्या लोकांवर गुन्हे दाखल करा. यासाठी लोकांनी रात्री आठ वाजेपर्यंत गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलिसांना विनवणी केली, तरी पोलिसांनी सर्वसाधारण तक्रार दाखल करून घेतली. घटना घडून तीन दिवस झाले तरी पोलिसांनी सासरच्या लोकांवर गुन्हे दाखल केले नसल्याने सिरसाळा पोलीस सासरच्या लोकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप मुलीचे वडील भीमराव लांडगे, भाऊ रवी लांडगे यांनी केला आहे. सासरच्या लोकांची चौकशी करून सासरच्या लोकावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

तिसऱ्या दिवशीही महिलांचा ठिय्या

नवविवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सासरच्या लोकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा यासाठी महिलांनी सिरसाळा पोलीस ठाण्यासमोर तिन दिवस होऊन ही गुन्हा दाखल न केल्याने तिसऱ्या दिवशीही ठिय्या मांडला असून शिरसाळा पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप महिला नातेवाईकांनी केला आहे.