बीड

चक्क जुन्या आरटीओंच्या स्वाक्षरीने बनवले जेसीबीचे बनावट कागदपत्र!

By Keshav Kadam

August 20, 2022

एजंट सय्यद शाकेरसह आरटीओतीलवरिष्ठ लिपिकावर फसवणुकीचा गुन्हाबीड दि.19 : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोठ्या प्रमाणात बनावटगिरी होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. या कार्यालयातील एका वरिष्ठ लिपिकेला हाताखाली धरत एजंट सय्यद शाकेर याने चक्क जुन्या आरटीओंच्या स्वाक्षर्‍या करुन जेसीबीचे बनावट कागदपत्र तयार केले. शासनाचा कर बुडवून शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.19) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात नेहमीच एजंटांचा सुळसुळाट पहायला मिळतो. सहजरित्या होणारी कामेही माहितीचा अभाव असल्याने वाहनधारक एजंटांकडे धाव घेतात. तसेच जी कामे आरटीओ कार्यालयातून होत नाहीत, अशीही कामे अधिकचा दाम मोजून एजंटकडून करण्यासाठी वाहनधारकांची धडपड असते. येथील एजंट सय्यद शाकेर याने कार्यालयातील वरिष्ठ लिपिक सुरेखा डेडवाल यांना हाताशी धरत चक्क जुन्या आरटीओंच्या बनावट स्वाक्षर्‍या घेवून जेसीबीची कागदपत्रे तयार केली. हा प्रकार येथील अधिकार्‍यांच्या निदर्शनास आल्यानंतर मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने यांनी बीड ग्रामीण ठाण्यात जावून फिर्यादी दिली. या प्रकरणी एंजट सय्यद शाकेर, वरिष्ठ लिपिक सुरेखा डेडवाल यांच्यावर कलम 409, 420, 120, 468, 471 कलमान्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे करत आहेत.