prakash solanke

न्यूज ऑफ द डे

पीकविमा अग्रीम, अतिवृष्टीच्या अनुदानासाठी आ.सोळंकेंनी बोलवली सर्वपक्षीय बैठक

By Balaji Margude

September 13, 2022

माजलगाव, दि.12 : जिल्ह्यातील सोयाबीन पीकाचा 25 टक्के अग्रीम विमा आणि अतिवृष्टी अनुदानातून जिल्ह्याला वगळल्यामुळे शेतकर्‍यांचा संताप वाढलेला आहे. याच अनुषंगाने आ.प्रकाश सोळंके यांनी काल माजलगाव तहसील कार्यालयात प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. तर उद्या 14 सप्टेंबर 2022 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस सर्वपक्षीय नेते, सामाजिक, राजकीय संघटना, शेतकरी संघटना यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आ.सोळंके यांनी केले आहे.बीड जिल्ह्यात मधल्या काळात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन पिके करपून गेली होती. त्यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. आपल्या पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांनी त्यासाठी पीक विम्याचे कवच घेतलेले आहे. याच विम्यापोटी सोयाबीनचे नुकसान झाले म्हणून 25 टक्के अग्रीम रक्कम देण्याची तरतूद आहे. एकीकडे पाऊस नसल्याने झालेले नुकसान तर दुसरीकडे अतिवृष्टीने झालेले नुकसान या दोन्ही विरोधाभास दर्शविणार्‍या गोष्टी असल्यातरी प्रत्यक्षात याचा फटका शेतकर्‍यांच्या पिकांना बसलेला आहे. त्यामुळे पीकविमा कंपन्यांनी शेतकर्‍यांना अग्रीम द्यावे आणि महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टीतून वगळलेल्या बीड जिल्ह्याला मदत करावी, यावर चर्चा करण्यासाठी आणि पुढील रुपरेषा ठरविण्यासाठी आ.सोळंके यांनी ही सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे. बैठकीस सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आ.सोळंके यांनी केले आहे.