डॉ. फपाळ यांचा मृतदेह सापडताना एनडीआरएफचा जवान मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

वैजेनाथ घायतिडक । माजलगाव
दि.19 : रविवारी सकाळी माजलगाव धरणात पोहायला गेलेले डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांचा मृतदेह 24 तासानंतरही बचाव पथकाला मिळालेला नाही. मात्र या बचावकार्या दरम्यान आणखी एक दुर्दैवी घटना घडली असून एनडीआरएफच्या कोल्हापूर येथील बचाव पथकातील कर्मचारी राजू मोरे हे देखील मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात अडकल्याची माहिती मिळत आहे. बचाव कार्य करत असताना ते ऑक्सिजन सिलींडरसह पाण्यात उतरले होते. मात्र मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात ते अडकल्याने त्यांना ओढून बाहेर काढत असताना त्यांचा ऑक्सिजन सिलींडर निसटून वर आला. मात्र मोरे हे अद्यापही पाण्याखालीच आहेत. तर दुसर्‍या एका बुडालेल्या कर्मचार्‍याला महत्प्रयासांनी बाहेर काढण्यात आले असून त्याच्यावर माजलगावच्या देशपांडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

डॉ. फपाळ यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बीड, परळी, येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करीत होते. आज त्यांच्या मदतीला कोल्हापूर येथील एनडीआरएफची टीम धावून आली. या टिमने शोधकार्य सुरू केले. मात्र धरणात मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात अडकून टीममधील दोन सदस्य पाण्याखाली अडकून पडले. त्यांना बाहेर काढताना झालेल्या खेचाखेचीत राजू मोरे यांचा ऑक्सिजन सिलींडर निसटून वर आला. साधारण 45 मिनिटांपासून त्यांचाही शोध बचाव पथकातील कर्मचारी घेत आहेत. तर दुसर्‍या एका शुभम काटकर या कर्मचार्‍याला 15 मिनिटानंतर बीडच्या बचाव पथकाने वर काढले. त्याच्यावर माजलगावच्या देशपांडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी निलम बाफना, तहसीलदार वर्षा मनाळे, मुख्याधिकारी विशाल भोसले, माजलगाव शहर पोलीस ठाण मांडून आहेत. शहरातील नागरिकही मोठ्या प्रमाणावर माजलगाव धरणावर दाखल झालेले आहेत.
———-

Tagged