न्यूज ऑफ द डे

माजलगाव धरणात बुडालेल्या डॉ.फपाळ यांचा मृतदेह सापडला

By Balaji Margude

September 19, 2022

गणेश मारगुडे । खानापूर (माजलगाव) दि.19 : रविवारी सकाळी माजलगाव धरणावर पोहण्यास गेलेले तेलगाव येथील डॉ. दत्तात्रय श्रीमंतराव फपाळ यांचा मृतदेह सायंकाळी पाचच्या सुमारास हाती लागला आहे. येथील मच्छिमारांनी गळ टाकून त्यांचा शोध घेतला असता त्यात त्यांचा मृतदेह हाती लागला. माजलगाव तालुक्यातील बेलोरा येथील दत्तात्रय श्रीमंत फपाळ (वय 45) यांचे तेलगाव येथे अजिंक्य हॉस्पिटल आहे. ते गेल्या काही दिवसापासून माजलगाव येथे वास्तव्यात होते. रोज सकाळी माजलगावच्या धरणामध्ये पोहायला जात होते. दररोजच्या प्रमाणे रविवारी ते पोहायला गेले असताना पोहत पोहत ते लांबपर्यंत गेले. मात्र त्यांना धाप लागल्याने ते बुडाले. याची माहिती आपत्ती व्यवस्थापन पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी शोध सुरू केला. मात्र अंधार पडल्याने काल शोधकार्य थांबवण्यात आले. आज कोल्हापुरचे आपत्ती व्यवस्थापन पथक माजलगावात दाखल झाले. त्यावेळी दोन जवान ऑक्सिजन सिलींडरसह धरणात उतरले. मात्र त्यातील राजशेखर प्रकार मोरे 30 रा. कोल्हापूर मच्छिमारांच्या जाळ्यात अडकून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी सव्वा एकच्या सुमारास त्या जवानाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर सायंकाळी पाच वाजता डॉ. दत्तात्रय फपाळ यांचा मृतदेह हाती लागला आहे.