न्यूज ऑफ द डे

सोयाबीनच्या भिजलेल्या ढिगाकडे बघत शेतकर्‍याचा गळफास

By Balaji Margude

October 15, 2022

अमोल जाधव/ नांदूरघाटपरतीच्या पावसाने काढणीला आलेलं आणि काढून ठेवलेल्या सोयाबीनचे नुकसान झाल्याने अल्पभुधारक शेतकर्‍याने आज लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना केज तालुक्यातील राजेगाव येथे 15 ऑक्टोबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास घडली.संतोष अशोक दौंड (वय 40 रा. राजेगाव ता. केज) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. संतोष यांना तीन मुली आणि एक मुलगा असून त्यातील एक मुलगी लग्नाला आलेली आहे. यावर्षीच्या पिकाचे पैसे आल्यावर मुलीचं लग्न करता येईल, अशी इच्छा त्यांनी घरी बोलून दाखवलेली होती. मात्र परतीच्या पावसाने डोळ्यादेखत काढलेलं सोयाबीन वाहून गेलं तर काही भिजलं. तर काही तसेच काढणीवाचून राहीलं आहे. काही ठिकाणी कापूस होता त्याच्या देखील पावसाने वाती झाल्या. आता मुलीचं लग्न कसं करायचं? सोसायटीचं कर्ज कसं फेडायचं? या नैराश्येतून त्यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.सकाळी सोयाबीन वेचायला गेलेला संतोष अजून कसे परतले नाही, हे पाहण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांना त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेहच दिसल्याने त्यांनी एकच टाहो फोडला. घटनेची माहिती मिळताच नांदूरघाट चौकीचे जमादार अभिमान भालेराव, पोलीस नाईक रशीद शेख यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदूरघाट ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे.