आईच्या डोळ्यादेखत दरीत उडी मारून युवकाची आत्महत्या

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाईच्या मुकुंदराज परिसरातील घटना

अंबाजोगाई : येथील मुकुंदराज परिसरात वनविभागाने तयार केलेल्या व्ह्यू पॉईंटवरून खोल दरीत उडी मारून २० वर्षीय युवकाने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज सोमवारी (दि. ३१) सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास घडली. दिनेश नरेश लोमटे (रा. कोष्टी गल्ली, अंबाजोगाई) असे त्या मयत युवकाचे नाव असल्याचे समजते.

आज पहाटेच दिनेश आत्महत्या करण्यासाठी मुकुंदराज परिसराकडे धावत सुटला होता. पाठीमागून त्याची आई त्याला रोखण्यासाठी आरडाओरडा करत धावत होती. हे पाहून मॉर्निंग वॉकसाठी त्या परिसरात असणारे पत्रकार दत्ता आंबेकर, बालाजी खैरमोडे, मारुती जोगदंड आणि अशोक दळवे यांनी दिनेशला रोखून त्याची समजूत घातली. तो शांत झाल्याचे पाहून त्याला त्याच्या आईजवळ सोडून सर्वजण निघून गेले. मात्र, थोड्याच वेळात दिनेशने बुट्टेनाथ रोडवरील वनविभागाच्या व्ह्यू पॉईंटवरून आईच्या डोळ्यादेखत खोल दरीत उडी मारली. आईचा आरडाओरडा ऐकून पत्रकारांनी पुन्हा तिकडे धाव घेतली. अशोक दळवे यांनी दरीत उतरून पाहिले असता दिनेश मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. अंबाजोगाई शहर पोलिसांना खबर देण्यात आली असून पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

Tagged