निवडणूक कर्तव्यात कसूर; ६ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आदेश

वडवणी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ६ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबतच्या आदेश वडवणीचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी दिले आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून वडवणी तालुक्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली.
सध्या होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वडवणी तालुक्यात निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांसह इतर विभागातील ६ कर्मचाऱ्यांवर मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या कामकाजात हलगर्जीपणा केला. त्यामुळे वडवणीचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार एस.के. मंदे यांना प्राधिकृत केले असून तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाची प्रत वडवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना दिली आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत वडवणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार
मतदान केंद्रावर नेमणूक करण्यात आलेल्या रवींद्र धर्मराज गायकवाड, महारुद्र ललितराव बादाडे, शाहूराव पांडुरंग जायभाये, दिलीप देवजी माऊची, सुवर्ण सखाराम आयचित, व्ही.एस. डाके या सहा शिक्षकांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे.

Tagged