collector beed

न्यूज ऑफ द डे

कामाच्या ठिकाणी काम टाईमपास चालणार नाही – दीपा मुधोळ मुंडे

By Keshav Kadam

February 15, 2023

बीड दि.15 : बिंदुसरा मोहीम सुरू होती ही समाधान मिळवणारी गोष्ट आहे. अशा मोहीम पुढे सुरू ठेवू. कुणालाही टार्गेट देऊन कामे करायची नाहीत. तर कामाच्या ठिकाणी काम करायचं आहे, फक्त टाईम पास नाही. बीड, उस्मानाबाद असो की इतर ठिकाण असो, महसूल विभागाला काम जास्त असते. कारण त्यांच्यावरच जास्त विश्वास असतो. त्यामुळे सर्वांनी मिळून जिल्ह्यासाठी चांगले काम करूया असे म्हणत उपविभागीय अधिकारी यांना मोकळे सोडणार नाही, त्यांच्याकडुन कामाचा आढावा घेणार असल्याचे दीपा मुधोळ मुंडे यांनी म्हटले.

निरोप समारंभ कार्यक्रम

बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल कर्मचारी संघटना यांच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांचे स्वागत समारंभ व जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाचे बुधवारी (दि.15) आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी शर्मा म्हणले की, बीड जिल्हा हा वाईट नाही. मी हजर झाल्यापासून तयारीतच होतो. कारण बदली कधीही होऊ शकते हे माहिती होते. बदली तर होत असते पण बीड सोडत असल्याचे दुःख होत आहे. बीड जिल्ह्याला पहिल्यांदाच महिला जिल्हाधिकारी मिळत आहेत ही आनंदाची बाब आहे. बीडची बाहेर प्रतिमा वाईट केलेली आहे. वाईट चर्चा आहेत, पण असे काहीही नाही. त्यामुळे प्रत्येकाने बोलण्यापेक्षा आपण जिल्ह्यासाठी काय चांगले करू शकतो हे पाहणे महत्वाचं आहे. त्यामुळे बीडची प्रतिमा चांगली होऊ शकते. आम्ही काय केलं ते सांगायची गरज नाही, तर ते आमचे काम असल्याचे सांगत शर्मा म्हणले की, प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दरी कमी झाली पाहिजे. तेव्हाच त्यांना वाटेल की प्रशासन आमच्यासाठीच काम करत आहे. माझ्या सोबत असलेली सर्वच टीम ही चांगली होती. त्यामुळे काम करण्यास अडचण आली नाही. सगळे अधिकारी, कर्मचारी चांगले आहेत, त्यांनी आणखी चांगले काम करावे असेही शर्मा म्हणाले.