क्राईम

होम क्वांरटाईन असलेल्या युवकाची आत्महत्या

By Keshav Kadam

June 14, 2020

पैठण, दि.14 : महाराष्ट्रात कोरोना आजाराचे थैमान सुरू असून कोरोनामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका ओळखून अनेक कुटुंब आपल्या मूळगावी परत येत आहेत. मुंबई येथे कामानिमित्त गेलेला असाच एक विवाहित तरुण तीन-चार दिवसापूर्वी पाचोड येथे आला असता त्याने रविवारी (दि.14 ) दुपारी स्वतःच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली मयत तरुणाला पाचोड पोलिसांनी ठाण्यात नेऊन अपमानस्पद वागणूक दिल्याने रागाच्या भरात आत्महत्या केल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. दरम्यान या घटनेची पाचोड पोलीस ठाण्यात अकस्मात म्हणून नोंद घेण्यात आली असून सदर युवकाचे आत्महत्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पाचोड येथील हा तरुण काही दिवसांपूर्वी कामधंद्यानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास होता. मात्र कोरोना साथीच्या लॉकडाऊनमुळे मुंबई शहरात कामधंदा मिळत नसल्याने संपत मरलीधर म्हस्के वय 27 रा.बैल बाजारतळ पाचोड येथे हा तरुण आपल्या कुटुंबासह मूळ गावी परतला. दरम्यान मुंबई सारख्या कोरोना हॉटस्पॉट मधून आल्याने खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने सदर युवकास होम क्वांरटाईन केले होते व त्याच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारलेला होता. तरीही तो गावात फिरत असल्याने रविवार रोजी पाचोड पोलिसांनी संबधित तरुणाला पोलीस ठाण्यात बोलावून त्याचा चांगलाच समाचार घेतल्याचे कळते. यानंतर सदरील तरुणाने थेट आपल्या घरी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लक्षात येताच घरच्यांनी एकच हंबरडा फोडला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पाचोड पोलिस ठाण्याला कळवली. त्यावेळी बिट जमादार सुधाकर मोहीते, गोरकनाथ कणसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन संपत म्हस्के यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले. पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जैन यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या घटनेची पाचोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.