क्राईम

माजलगाव शेजुळ हल्ला प्रकरणात चौघांना अटक!

By Keshav Kadam

March 10, 2023

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईबीड दि.10 : माजलगावचे भाजपा कार्यकर्ते अशोक शेजूळ यांच्यावर जीवघेणा हल्ला करणार्‍या आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी आवळल्या आहेत. प्रत्यक्ष हल्ला करणार्‍या पाच आरोपींपैकी चौघांना त्यांच्या घरून आणि हॉटेल लोकसेवा येथूल उचलण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.अविनाश बाबासाहेब गायकवाड (वय 26 रा. पुनंदगाव), संदीप बबन शेळके (वय 22) सुभाष बबन करे (वय 26), शरद भगवान कांबळे (वय 29, सर्वजण रा. पुरूषोत्तमपुरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर विजय शिवाजी पवार हा आरोपी फरार असल्याचे पोलीसांनी सांगितले. दरम्यान यातील मास्टरमाइंड कोण हे पोलीस शोधून काढणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.धुलीवंदना दिवशी माजलगाव येथे शाहू नगर भागात पतसंस्थेजवळ अशोक शेजूळ यांच्यावर अज्ञात पाच ते सहा जणांनी हल्ला केला होता. शेजूळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजलगावचे आ.प्रकाश सोळंके, त्यांच्या पत्नी मंगल सोळंके, रामेश्वर टवाणी यांनी हा हल्ला घडवून आणल्याचे म्हटले होते. त्यानुसार त्यांच्यावर माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा देखील नोंद करण्यात आला होता.शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत बारीक बारीक माहिती घेणे सुरू केले होते. त्यात प्रामुख्याने अशा प्रकारचे गुन्हे यापुर्वी माजलगावात कोणत्या टोळीने केले या अनुषंगाने तपास सुरू होता. पोलीसांना एका ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज देखील तपासादरम्यान मिळाले. मात्र आरोपींनी तोंडाला बांधलेले असल्याने पोलीसांना ते ओळखू येत नव्हते. मात्र आरोपींचे वय, शरीर यष्टी यावरून त्यांची ओळख पटवत पोलीसांनी या गुन्ह्यातील हल्ला करणारे आरोपी शोधून काढले आहेत