क्राईम

धीरजकुमारांची बीडमध्ये मटका अड्ड्यावर धाड!

By Keshav Kadam

March 17, 2023

नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांवर पोलीस ठाण्यात गुन्ह नोंदबीड .17 : मागील आठवडाभरापासून जिल्हा पोलीस दल अ‍ॅक्टिव मोडवर दिसत आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने अवैध धंद्यावर कारवायांचे सत्र सुरुच आहे. स्थानिक पोलीसांचा अवैध धंद्यांकडे होणारा कानाडोळा पाहता सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, डॉ.धीरजकुमार बच्चू, विशेष पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ यांच्या कारवाया होतांना दिसत आहेत. शुक्रवारी (दि.17) मध्यरात्री बीड शहरातील कब्बाडगल्ली येथे मटका अड्ड्यावर सहायक पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी धाड टाकली. यावेळी रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड शहरातील कबाड गल्लीत मटका अड्डा सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांना मिळाली. स्वतः पथकासह तिथे धाड टाकत केदार पवार, प्रवीण शेळके, सुनिल भालेराव यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख 4 लाख 46 हजार, 32 मोबाईल, 2 प्रिंटर, 35 कॅल्क्यूलेटर, 2 एलईडी स्क्रीन, 4 दुचाकी असा 9 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक कविता नेरकर, सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, सहायक निरीक्षक निलेश इधाटे, गणेश नवले, अशोक युवराज चव्हाण, तुकाराम कानतोडे, नामदास, संतराम थापडे, अजय गडदे, राजु कोकाटे यांनी केली. या कारवाईने बीड शहरात खळबळ उडाली आहे.

अपर अधीक्षकांचेपथकही होणार अ‍ॅक्टिव

स्थानिक पोलीसांच्या दुर्लक्षपणामुळे अवैध धंदे वाढले असल्याचे विशेष पथक, पंकज कुमावत, धीरजकुमार यांच्या कारवायावरुन दिसून येत आहे. त्यामुळे बीड विभागातील कारवायासाठी अपर अधीक्षक सचिन पांडकर यांचे पथक अ‍ॅक्टिव होणार असून हे पथकही मटका, गुटखा, जुगार यासह अवैध धंद्यांवर कारवाया करणार असल्याची माहिती आहे.