केज बाजार समिती निवडणुकीत रंगत
केज : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षात थेट लढत होत आहे. या निवडणुकीमध्ये बाजार समितीच्या मतदारांचे सामुहीक अपहरण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केला आहे. याबाबत त्यांनी थेट जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली असून मंगळवारी (दि.२५) लेखी तक्रार केली आहे.
केज येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये प्रथमच शिवसेनेने पॅनल उभा केला आहे. जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली १५ पैकी १४ जागा लढविल्या जात असून तगडे उमेदवार देण्यात आले आहेत. शिवसेनेची प्रचार यंत्रणा तगडी दिसत असल्याने तालुक्यातील अनेक दिग्गजांची मदत या पॅनल होताना दिसतेय, असे चित्र आहे. अशा परिस्थितीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून थेट मतदारांना ताब्यात घेतले जात आहे. या निवडणुकीत २ हजारांच्या घरात मतदान आहे. त्यामुळे यादीवरून मतदारांना शोधणे सहज शक्य होते. ताब्यात घेऊन मतदारांवर दबाव टाकला जात आहे. तसेच, मतदानासाठी विविध प्रकारची आमिषे दाखवली जात आहेत.
त्यामुळे केज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक निर्भयपणे पार पडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच योग्य त्या उपाययोजना करून बाजार समितीच्या निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केली आहे. निवेदन देताना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान, निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.