क्राईम

आयपीएस पंकज कुमावतांच्या पथकाची गुटख्यावर कारवाई!

By Keshav Kadam

May 13, 2023

बीड दि.13 ः सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या माजलगाव येथील पथकाने शनिवारी (दि.13) माजलगाव तालुक्यातील पात्रुड परिसरामध्ये गुटखा विक्रेत्यावर कारवाई केली. यावेळी त्याच्या घरात साठा करुन ठेवलेला 1 लाख 25 हजार 846 रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पात्रुड येथील मोमीन इब्राहिम अब्दुल हमील यांच्या घराचे समोर पत्र्याचे शेडमध्ये महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला आरएमडी, गोवा, राज निवास, विमल पान मसाला, हिरा पान मसाला या गुटख्याची विक्री केली जात होती. याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी छापा मारला. यावेळी 1 लाख 25 हजार 846 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी अशोक नामदास यांच्या फिर्यादीवरुन माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 328, 188, 272, 273, भारतीय दंड संहीता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सहायक पोलीस अधीक्षक उपविभाग केज, अतिरीक्त पदभार उपविभाग माजलगाव पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोह.अशोक नामदास, युवराज चव्हाण, गणेश नवले, संताराम थापडे, अजय गडदे, महिला कर्मचारी प्रभा ढगे यांनी केली.