goutami patil viral video

न्यूज ऑफ द डे

गौतमी पाटीलने मानसिक त्रास देत फसवणूक केल्याची पोलिसात तक्रार!

By Keshav Kadam

May 15, 2023

बार्शी दि.१५ : मानसिक त्रास आणि फसवणूक केल्याप्रकरणी नृत्यांगणा गौतमी पाटील विरोधात बार्शीत पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गौतमी पाटीलने उशिराने परफॉर्मन्स सादर केला. त्यामुळे 10 वाजल्यानंतर पोलिसांनी शो बंद पाडला. त्यामुळे नुकसान आणि बदनामी झाली असल्याची तक्रार आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी केली आहे.

सोलापुरातील बार्शी शहरात 12 मे रोजी गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तिच्या कार्यक्रमासाठी चाहत्यांनी खास तिकीटे काढून हजेरी लावली होती. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गौतमी पाटीलने कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. टाळ्या आणि शिट्यांनी तिचं स्वागत करण्यात आले. मात्र, गौतमी पाटील ही परफॉर्मन्स करण्यासाठी रात्री 9.56 वाजता स्टेजवर आली. एकच गाणं झाल्यानंतर पोलिसांनी वेळ संपली म्हणून कार्यक्रम बंद पाडला. मात्र, तिला संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आपले नृत्य सादर करायचे होते. गौतमी पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांनी फसवणूक करून मानसिक त्रास दिल्याचा आयोजक गायकवाड यांनी आरोप केला. गौतमी पाटील आणि तिचा सहकारी केतन मारणे यांच्याविरोधात बार्शी पोलिसात आयोजक गायकवाड यांनी तक्रार दाखल केली. नियोजित कार्यक्रमाला उशिरा येऊन माझी बदनामी करण्याच्या हेतूने फसवणूक केल्याचेही तक्रारदार गायकवाड यांनी आरोप केला आहे.