Official announcement of the name by the Congress as Chief Minister of Karnataka

न्यूज ऑफ द डे

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसकडून ‘या’ नावाची अधिकृत घोषणा

By Balaji Margude

May 18, 2023

बंगळुरू, दि.18 : कर्नाटकात अनेक दिवसांच्या विचारमंथन, बैठकांच्या सत्रानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. आता काँग्रेसनं कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरमय्या SIDDHRAMAYYA आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार DK SHIVKUMAR यांच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच, काँग्रेसकडून शपथविधी सोहळ्याचा दिवसही निश्चित करण्यात आला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, 20 मे रोजी दुपारी 12.30 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील इतर मंत्रीही शपथ घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.केसी वेणुगोपाल K C VENUGOPAL पुढे बोलताना म्हणाले की, सिद्धरमय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील. 13 मे रोजी पक्षाला बहुमत मिळाले, 14 मे रोजी सीएलपीची बैठक झाली, ज्यामध्ये काँग्रेस पक्षानं निरीक्षकांची नियुक्ती केली. ते म्हणाले की, काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष आहे. आमचा एकमतावर विश्वास आहे, हुकूमशाहीवर नाही. सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार हे दोघंही पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. दरम्यान, कर्नाटक निवडणुकीत विजय झाल्यानंतर 14 मे रोजी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (सीएलपी) संध्याकाळी बंगळुरूमध्ये मुख्यमंत्री निवडीसाठी बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते ठराव संमत करून विधीमंडळ पक्षनेते निवडीचे अधिकार पक्षाध्यक्षांना देण्यात आले. यानंतर आमदारांचं मत जाणून घेण्यासाठी बंगळुरूला पाठवलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया हे तीन निरीक्षक सोमवारी दिल्लीत परतले. या नेत्यांनी आमदारांची मत जाणून घेण्यासाठी गुप्त मतदानही घेतलं. डीके शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांचा दावा आहे की, दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी प्रत्येकी अडीच वर्षे मिळतील, परंतु याला काँग्रेसच्या नेत्यांकडून अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावरील चर्चा 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकांपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, सिद्धरमय्या यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला पूर्णपणे फेटाळून लावला. याबाबत आपल्याला काहीही माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं. कर्नाटकातील विधानसभेच्या 224 जागांपैकी काँग्रेसनं 135 जागा जिंकल्या आहेत. तर भाजप 66 जागा आणि जेडीएस 19 जागांवर घसरले. 13 मे रोजी (शनिवारी) राज्यात निकाल लागला. तेव्हापासून सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यापैकी कोण कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री होणार? हा प्रश्न कायम होता.