धक्कादायक! पालकमंत्री अतुल सावे १० टक्के…

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

आमदार बाळासाहेब आजबेंचा गंभीर आरोप

आष्टी : बीडचे पालकमंत्री तथा राज्याच्या सहकारमंत्री अतुल सावे बीड जिल्ह्यात एजंटांमार्फत 10 टक्कांनी वसुली करत असल्याचा आरोप आष्टीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी केला आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी 10 टक्के देऊन कामे आणली आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. बीडमध्ये रविवारी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

अतुल सावे यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकत्व दिले, मात्र ते पुरेसा वेळ देत नाहीत, कधी येत नाहीत. जिल्ह्यातील विकासकामे खोळंबली आहेत, अशी टीका त्यांच्यावर सातत्याने केली जाते. आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले की, अतुल सावे हे एजंट नेमून विकास कामाच्या नावाखाली टक्केवारी गोळा करत आहेत. त्यांनी जिल्ह्यातून कामांसाठी 10 टक्क्यांनी वसुली केलीय. आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी 10 टक्के देऊन कामे आणली आहेत. टक्केवारी दिल्याशिवाय एकही काम त्यांनी दिले नाही, असा आरोपही आजबे यांनी केला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अवकळी पाऊस आणि गारपीटीने जिल्ह्यात शेती व मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, जनावरे दगवाली होती, तर अनेकांची घरेही पडली होती. मात्र त्यावेळीही पालकमंत्री म्हणून सावे यांनी जिल्ह्याचा दौरा केला नव्हता. त्यामुळे आधीपासूनच सावे यांच्याबद्दल नाराजीचे वातावरण होते. त्यात आता राष्ट्रवादीच्या आमदाराने त्यांच्यावर चक्क 10 टक्के वसुलीचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्रकार परिषद घेवून हे गंभीर आरोप केले आहेत.

Tagged