मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये 15 जून 2020 पासून ऑनलाइन तसंच डिजिटल माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यास मान्यता दिली आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसंच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, तसेच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरु कराव्यात तसेच दुसरीकडे ऑनलाइन, डिजिटल पद्धत पायलट प्रोजेक्ट म्हणून तातडीने राबवावी असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी शाळा एकवेळ सुरु नाही झाल्या तरी आरोग्याची काळजी घेऊन शिक्षण सुरु झाले पाहिजे या विधानाचा पुनरुच्चार केला. कशा पद्धतीने शाळा सुरु होणार आहेत? रेड झोनमध्ये नसलेल्या 9 , 10 12 वी शाळा-कॉलेज जुलैपासून सुरु होणार आहेत. तर सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून सुरु होतील. तसंच तिसरी ते पाचवीर्यंतचे वर्ग सप्टेंबरपासून तर पहिली आणि दुसरीचे वर्ग व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने सुरु होतील असं सांगण्यात आलं आहे. 11 वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणार्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन आहे. ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाही तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. काही कंपन्यांनी इतर राज्यांत प्रयोग केले आहेत त्याचीही परिणामकारकता तपासावी असंही मुख्यमंत्र्यांनी बैठकीदरम्यान सांगितलं आहे. पहिली, दुसरीसाठी ऑनलाइन नाही ऑनलाइनबाबत पालकांच्या मतांचा विचार करण्यात आलेला आहे. पहिली व दुसरीची मुले लहान असतात, त्यांच्यासाठी ऑनलाईन पर्याय दिला जाणार नाही. तिसरी ते पाचवीच्या मुलांना दररोज एक तास व पुढील वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाइन, डिजिटल शिक्षण देण्याचे नियोजन आहे अशी माहिती वर्ष गायकवाड यांनी बैठकीदरम्यान दिली.