150 कोटी घेऊन बबन शिंदे फरार झाल्याची फिर्याद
बीड दि.4 ः अधिकचे व्याजदर देणार्या बँकेत ठेवीदार मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवतात, या ठेवी बँकेतील संचालक स्वतःच्या व्यवसायात गुंतवणूक करतात. व्यवसाय कोलमडला की बँकही बुडते. अशा बँक बुडल्याच्या घटना बीड जिल्ह्यासाठी नवीन नाहीत, यापुर्वीही अनेक बँक बुडालेल्या आहेत. मागील काही महिन्यापासून शहरातील माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटमध्येही घोळ सुरु आहे. ठेवीदारांसह कुठल्याच खातेदारांना रक्कम मिळत नव्हती. मात्र संचालक मंडळाकडून आठवडाभरानंतर, महिन्यानंतर, दोन दिवसांनी, चार दिवसांनी पैसे देऊ अशी आश्वासने दिली जात होती. अखेर ठेवीदारांचा सयंम तुटला आणि सोमवारी (दि.3) रात्री शिवाजीनगर पोलीसात धाव घेतली. ठेवीदारांनी दिलेल्या फिर्यादीवरुन माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटच्या सर्व संचालक मंडळावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अॅड.संतोष आप्पासाहेब जगताप (रा.चाणक्यपुरी, ता.बीड) यांनी शिवाजीनगर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माँसाहेब जिजाऊ बँकेचे बबन शिंदे हे 150 कोटी रुपयांची ठेवी घेऊन फरार झाले आहेत. यासह त्यांनी बँकेमध्ये ठेवलेल्या ठेवी गैरमार्गाने वापरत स्वतःच्या स्वार्थासाठी हा पैसा खर्च केला आहे. यामुळे ठेवीदारांना पैसे देण्यास बँक असमर्थ झाली. माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेट दिवाळखोरीत निघाली आहे. सर्वसामान्यांनी आपला पैसा सुरक्षित राहावा, यामुळे या ठिकाणी ठेवला होता. परंतु येथील कार्यकारणीच्या मनमानीमुळे मात्र कोट्याधी रुपयांचा अपहार झाला आहे. तसेच सदर बँकेचे अध्यक्षा अनिता बबन शिंदे यांचे पती बबन विश्वनाथ शिंदे तसेच त्यांचा मुलगा मनिष बबन शिंदे यांनी मला व माझ्या कुटुंबीयांना वारंवार भेटून जास्त व्याजदराचे अमिष दाखवून संगनमत करून कट रचून पैसे बबन शिंदे यांनी पैसे त्यांच्या पत्नीचे जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेटमध्ये ठेवण्याचे वारंवार सांगितले. तसेच त्यांचे चिरंजीव मनिष बबन शिंदे व जावाई योगेश करांडे यांनी त्यांचे जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेट बैंकमध्ये जास्त म्हणजेच वार्षीक 13 टक्के दराने व्याजदराचे आमिष देऊन पैसे टाकण्यास सांगितले. वारंवार नाही म्हणालो तरीही घरी येऊन, बाहेर रस्त्यावर भेटून आम्हास अमिष दाखवून अमचे मत परिवर्तन करत बँकेत पैसे भरा असे सांगितल्याने आम्ही त्यांच्या कट कारस्थानात बळी पडून पैसे बँकेत भरले.
संचालक मंडळासह इतरांवर गुन्हे दाखल
फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटच्या अध्यक्षा अनिता बबन शिंदे, बबन शिंदे, मनीष शिंदे, योगेश करंडे, अश्विनी सुनील वांढरे व बँकेचे सर्व कार्यकारी मंडळावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.
स्वतःच्या फायद्यासाठी
बँकेतील पैशाची गुंतवणूक
बबन विश्वनाथ शिंदे यांनी सदर अपहार केलेली रक्कम त्यांचे शैक्षणिक संस्थेस मेडीकल कॉलेज आणण्यासाठी दिल्ली येथे दिल्याचे सांगतात. तसेच शिंदे यांनी पुणे जिल्ह्याच्या परिसरात 40 एकर जमिन, 2 फ्लॅट, औरंगाबाद व दिल्ली येथे प्रॉपर्टीत गुंतविल्याचे ऐकण्यात येते. बीड तालुक्यात पांगरी रोडवर 20 एकर जमिन, त्या जागेवर शैक्षणिक संस्था आहे. ती 17 एकर जागा सुध्दा सदरील इसमाने बाजार भावा पेक्षा कमी भावामध्ये रजिस्ट्री करून ट्रान्स्फर करुन ठेवल्या आहेत. स्वतःच्या मालकीच्या कार, संस्थेच्या गाड्या ट्रान्सफर करून ठेवल्या आहेत. तसेच तेथील दोन संस्था, दोन कॉलेज विकून टाकण्याच्या बेतात असून संस्थेतील साहित्यही विकत आहेत. सर्व विक्री करुन फरार होण्याच्या बेतात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.