क्राईम

जिजाऊ मल्टीस्टेटच्या अध्यक्षांच्या घराची झाडाझडती!

By Keshav Kadam

July 13, 2023

फरार आरोपींच्या शोधार्थ तीन पथकेबीड दि.12 : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेटच्या (jijau masaheb multistate) संचालक मंडळावर गुन्हा दाखल आहे. यात अध्यक्षा अनिता शिंदे पोलीस कोठडीत असून इतर आरोपींच्या शोधार्थ पोलीसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच या प्रकरणात संचालक मंडळतील सदस्यांनाही आरोपी करण्यात येणार असून त्या संचालक मंडळाची पोलीसांकडून माहिती काढली जात आहे. दरम्यान बुधवारी (दि.12) दुपारी मल्टीस्टेटच्या अध्यक्ष अनिता शिंदे यांच्या घराची आर्थिक गुन्हे शाखेच्या टिमने झाडाझडती घेतली.

बीड येथील जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेटमध्ये ठेवीदारांची फसवणूक झाल्याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल आहे. यामध्ये मल्टीस्टेटच्या अध्यक्षा अनिता बबन शिंदे, बबन विश्वनाथ शिंदे हे मुख्य आरोपी असून मनीष बबन शिंदे, योगेश करंडे, अश्विनी सुनील वांढरे यांचा इतर आरोपीत सहभाग आहे. बँकेच्या कार्यकारी मंडळाचा शाखेत असलेले बोर्ड गायब आहे. त्यामुळे संचालक मंडळात कुणाकुणाचा सहभाग आहे, हे निष्पन्न झालेले नाही. त्यासाठी पोलीस माहिती काढत असून ही नावे निष्पन्न झाल्यानंतर आरोपींच्या संख्येत वाढ होणार आहे. अध्यक्षा अनिता शिंदे पोलीस कोठडीत असून इतर फरार आरोपींच्या शोधार्थ आर्थिक गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, शिवाजीनगर पोलीस अशी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. ठेवीदारांच्या पैशातून शिंदे कुटूंबीयांनी काही प्रॉपर्टी खरेदी केली आहे का? त्याचे काही पुरावे मिळतील या अनुषंगाने बुधवारी त्यांच्या घराची आर्थिक गुन्हे शाखेच्या टिमने झाडाझडती घेतली. अधिक तपास हरिभाऊ खाडे करत आहेत.

चौकटनेकनूर पोलीसातहीगुन्हा दाखल होणार

जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेटची नेकनूर येथेही शाखा आहे. तिथेही ठेवीदारांची फसवणूक झाल्यामुळे सोमवारी (दि.10) ठेवीदारांनी नेकनूर ठाण्यात गर्दी केली होती. शंभरपेक्षा अधिक जणांची तक्रार असून एका ठेवीदाराच्या फिर्यादीवरुन आज गुन्हा दाखल होणार आहे. तर इतरांचे जबाब नोंदवले जाणार असल्याची माहिती नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक विलास हजारे यांनी दिली.