3 क्विंटलचा पुष्पहार अन् जेसीबीतून फुलांची उधळण
बीड दि.13 : महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर गुरुवारी (दि.13) प्रथमच धनंजय मुंडे बीडमध्ये येणार असल्याने राष्ट्रवादीचे बीड मतदारसंघाचे नेते बबनराव गवते, सभापती बळीराम गवते यांनी त्यांच्या स्वागताचे जंगी नियोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनंजय मुंडे आल्यानंतर ‘धनंजय मुंडे तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ म्हणत जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करत क्रेनद्वारे पुष्पहार घालण्यात आला. मंत्री धनंजय मुंडे यांचे बीडमध्ये अभुतपूर्व स्वागत करुन बबन गवते यांनी ताकद दाखवली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी पहायला मिळाली.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, धनंजय मुंडे यांनी सत्तेत सहभाग घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव गवते यांच्यावर बीड मतदारसंघाची जबाबदारी टाकण्यात आली. धनंजय मुंडे प्रथमच बीड येथे येणार असल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले हाते. गेल्या चार दिवसांपासून या सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. मुंडे हे दुपारी 3 वाजता बीडमध्ये आले असता जवळपास अर्धातास फटाक्यांची अतिषबाजी करत जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. गवते यांनी केलेले स्वागताचे नियोजन पाहून धनंजय मुंडे भारवून गेले होते. या नागरी सत्कार सोहळ्यासाठी बीड मतदारसंघातील गावागावातून कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून आली. यावेळी व्यासपिठावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर, युवक अध्यक्ष नंदकुमार कुटे, पंचायत समिती सभापती बळीराम गवते, पंचायत समिती सदस्य मोहन देवकते, उत्तरेश्वर सोनवणे, किशोर सुरवसे, किशोर वायसे, कांता शिंदे, गुंडीबा नवले यांची प्रमूख उपस्थिती होती. बळीराम गवते यांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना विठ्ठलाची मुर्ती देत सत्कार केला. यावेळी ‘धनंजय मुंडे तुम आगे बढो, बळीराम गवते तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता.
बीडचा विकास हे आमचे ध्येय-बळीराम गवते
मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे हे प्रथमच जिल्ह्यात आले असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विकासाच्या दृष्टीने आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, ना.धनंजय मुंडे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. बीडचा विकास हेच आमचे ध्येय असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण एकजुटीने काम करणार असल्याची प्रतिक्रिया माजी सभापती बळराम गवते यांनी दिली.\