बीड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड विधानसभा अध्यक्षपदी डॉ.योगेश क्षीरसागर

By Shubham Khade

October 10, 2023

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड विधानसभा अध्यक्षपदी युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांची मंगळवारी (दि.१०) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या सूचनेवरून जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मुंबई येथील पक्ष कार्यालयात पक्षश्रेष्ठींच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. दरम्यान, डॉ.योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून बळ दिले जात आहे. आता त्यांना बीड विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. निवडीबद्दल डॉ.योगेश क्षीरसागर यांचे आ.प्रकाश सोळंके, आ.बाळासाहेब आजबे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

कोटराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठपणे जबाबदारी पार पाडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार बीड मतदारसंघात तळागाळात पोहोचविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील. पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देणार आहे. डॉ. योगेश क्षीरसागर, बीड विधानसभाध्यक्ष