मटका बुकीवर धाड; 78 जणांवर गुन्हा दाखल

बीड

गणेश कुरकुटे, बालाजी टकले नितीन खोडसह 78 जणांवर गुन्हा
बीड : सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मटकाबहाद्दरांचे कंबरडे मोडले अशीच कारवाई केली आहे. मंगळवारी रात्री वडवणी शहरातील मटका बुकीच्या ऑफिसवर धाड टाकत मटका एजंट गणेश कुरकुटे, जागा मालक टकले, मटका बुकी मालक नितीन खोड यांच्यासह तब्बल 78 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने मटका माफियांमध्ये खळबळ माजली असून एवढ्या मोठ्या संख्येने आरोपीत समावेश करण्याची ही पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

वडवणी शहरात गणेश राजाभाऊ कुरकुटे (रा.काळा मारुती नगर, वडवणी) हा बेकायदेशीररित्या मटक्याचा अड्डा चालवीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. मंगळवारी छापा मारला असता गणेश राजाभाऊ कुरकुटे व इतर दहा लोक मटक्याच्या आकड्याची एजंटकडून आलेल्या चिठ्ठ्यांची मटका बुक्की ऑफिसमध्ये छाननी करताना आढळून आले. मटका बुकी मालक गणेश कुरकुटे यांना विचारून व त्यांच्या ताब्यात मिळालेल्या मोबाईलच्या व्हाट्सअप चॅटिंग वरून त्याने 65 एजंट कडून दहा टक्के कमिशनवर मटक्याचा धंदा घेत असल्याचे सांगितले. यावेळी 2 लाख 88 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच सदर जागा ही बालाजी टकले यांच्याकडून जास्तीचे पैशावर भाड्याने घेतल्याचे सांगितले. मटका धंद्याची फिरती कटिंग नितीन खोड (रा.बीड) यास देत असल्याचे सांगितले. याप्रकरणी पोना.दिलीप गीते यांचे फिर्यादी वरून एकूण 78 आरोपीतांविरुद्ध पोलीस ठाणे वडवणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आनंद शिंदे, अंमलदार बालासाहेब डापकर, दिलीप गीते, अनिल मंदे, आशा चौरे, शमीम पाशा, गोविंद मुंडे, प्रकाश मुंडे, होमगार्ड चौरे यांनी केली.

Tagged