आता समाज पेटून उठला आहे,
आरक्षण मिळणारच- मनोज जरांगे
पाली येथील नियोजनाचे सर्वत्र कौतूक; सत्काराच्या कार्यक्रमाचे सभेत रूपांतर
बीड दि.15 : प्रत्येकाच्या आई वडिलांचे स्वप्न असते की आपली मुले मोठे होऊन अधिकारी व्हावेत. मात्र आरक्षण असतानाही आपले पुरावे लपवून ठेवत आरक्षण दिले नाहीत. त्यामुळे समाजावर अन्याय केला. मात्र आता समाज पेटून उठला आणि लाखोच्या संख्येने कुणबी नोंदी सापडल्या आहेत. ज्यांच्या घरात नौकरी आहे ते लोक आनंदी आहेत. मात्र ज्यांच्या घरात कुणालाच नोकरी नाही त्यांच्या घरात आनंद नाही. 70 वर्षापासून समाजावर अन्याय केला आहे. मात्र आरक्षण नसल्यामुळे अनेकांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. सगळे आयुष्य उद्ध्वस्त झाले. पण आता आरक्षण घेतल्याशिवाय हटायचे नाही असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
बीड तालुक्यातील पाली येथे बुधवारी (दि.15) मनोज जरांगे पाटील हे वाशी येथील सभेसाठी जात असताना सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्कलच्यावतीने त्यांचा ओबीसी, दलीत अन् मुस्लिम बांधवांनी केला सत्कार केला. या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी सत्काराच्या कार्यक्रमाचे मोठ्या सभेत रूपांतर झाले होते. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सध्या मराठा आरक्षणासाठीची सर्व सामान्यांची लढाई आहे. गोरगरीब मराठ्यांनी मोठा धाक निर्माण केला आहे. त्यामुळे सरकारही टेन्शनमध्ये आहे. मी नेत्यांपेक्षा समाजाला मानतो, माझी खानदानी मराठ्याची ओलाद आहे. आणि सामान्यांची ताकत मोठी असते. आज लाखोच्या संख्येने कुणबी नोंदी सापडत आहेत, त्यामुळे सरसकट आरक्षण देऊन टाकावे असे आवाहनही मनोज जरांगे यांनी केले. यावेळी भर उन्हात हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.