court

बीड

मराठा आरक्षण आंदोलन; आरोपीचा जामीन अर्ज उच्च न्यायालयात मंजूर

By Shubham Khade

December 08, 2023

आंदोलक तरुणाला दिलासा

बीड : मराठा आरक्षण आंदोलनात बीड शहरात झालेल्या हिंसाचार प्रकरणातील अटक आरोपी ओंकार दिनेश ठोसर याचा जामीन अर्ज उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे न्यायमुर्ती एस.जी. चपळगांवकर यांनी मंजूर केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक किरण पवार यांच्या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे बीड शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीत फिर्यादीने म्हटले आहे की, दि.३० ऑक्टोबर २०२३ रोजी बेकायदेशीर जमावाने आरक्षण मिळालेच पाहिजे असे म्हणत सुभाष रोड, बीड येथे दगडफेक करुन वाहनांचे नुकसान केले. सदर जमावाने माजी मंत्र्याच्या घरावर दगडफेक करुन मालमत्तेचे नुकसान केले. पोलीसांवर सुध्दा दगडफेक करुन त्यांना जखमी केले. या जमावाने जिल्हा परिषद, नगरपालिका व राष्ट्रवादी भवनवर दगडफेक करुन मालमत्तेचे नुकसान केले होते. यावेळी पोलीसांनी या बेकायदेशीर जमावातील काही व्यक्तींना अटक केली होती. अर्जदार ओंकार दिनेश ठोसर याचा जामीन अर्ज सत्र न्यायालय, बीड यांनी फेटाळला होता. उच्च न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे की, जमाव बेकायदेशीर होता. परंतु अर्जदार आरोपी विरुध्द कोणतेही स्पष्ट आरोप फिर्यादीत दिसून येत नाहीत. अर्जदार आरोपी हा जमावात सहभागी असण्याची शक्यता दिसत नाही. आरोपी पोलीसांच्या ताब्यात असताना त्याच्याकडून काहीही जप्त केलेले नाही. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. सुदर्शन जी. साळुंके यांनी काम पाहिले. तर सरकारतर्फे ॲड. आनंद शि. शिंदे यांनी काम पाहिले.