raj thackeray and shiv sena symbol

loksabha election 2024

सत्तेसाठी या थराला जाऊन स्वाभिमान गहाण टाकणं माझ्याने शक्य नाही-राज ठाकरें

By Karyarambh Team

May 04, 2024

धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढण्याच्या ऑफरला राज ठाकरेंचं उत्तर

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराने धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढावे, असा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवण्यात आला तेव्हा मी हसलो. मी तो प्रस्ताव नाकारला, कारण सत्तेसाठी स्वाभिमान गहाण टाकणं माझ्याने शक्य नाही, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले. ‘बोल भिडू’ या वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी या मुद्द्यावर भाष्य केले.

या मुलाखतीत राज ठाकरे यांना, ‘तुम्हाला धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली होती का?’, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी म्हटले की, मला धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढण्याची ऑफर मिळाली तेव्हा मी हसलो. मनसेचं इंजिन हे चिन्ह मी कमावलेलं चिन्ह आहे, मला ते कोर्टातून मिळालेले नाही. लोकांनी मतदान केल्यामुळे आम्हाला इंजिन चिन्ह मिळाले. त्यामुळे खासदारकीला उमेदवार उभा करायचा किंवा केवळ सत्तेसाठी मी माझ्या पक्षाच्या उमेदवाराला दुसऱ्या चिन्हावर उभा राहा, असे कसे सांगू शकतो? सत्तेसाठी या थराला जाऊन स्वाभिमान गहाण टाकणे माझ्याने शक्य नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

शिवसेनेचा पक्षप्रमुख व्हावं हा विचार मनाला कधीच शिवला नाही: राज ठाकरेशिवसेना हा बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे. त्या पक्षाचे नेतृत्त्व करायचे, हा विचार माझ्या मनाला कधीच शिवला नाही. मी एकविरा देवी किंवा अन्य कोणत्याही गोष्टीवर हात ठेवून ही शपथ घ्यायला तयार आहे. मी शिवसेनेचा पक्षप्रमुख व्हावं ही गोष्ट कधीच माझ्या मनात आली नाही. माझी एवढीच मागणी होती की, मला पक्षातील माझी जबाबदारी सांगा. नाहीतर मला फक्त निवडणुकीपुरता बाहेर काढायचं आणि नंतर बसवून ठेवायचं, हे मला मान्य नव्हते, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

मी शिवसेनेत असताना कोणत्याही पदाच्या लालसेने नव्हे तर केवळ माझ्या काकाला मदत करावी,याच भावनेने काम केले. मी पक्ष सोडला तेव्हा शिवसेनेचे 32 आमदार आणि 7 खासदार माझ्याकडे आले होते. मला पक्ष फोडायचा असता तर मी तेव्हाच शिवसेना फोडली असती. पण मला दगाफटका करायचा नव्हता. मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगून शिवसेनेतून बाहेर पडलो होतो, असे राज ठाकरे यांनी सांगितले.