पंकजाताई मुंडेंचा पुढील आठवड्यात आभार दौरा

न्यूज ऑफ द डे बीड

सर्व तालुक्यात जावून घेणार मतदारांची भेट

परळी : लोकसभा निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, अथक परिश्रम घेतले, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता काम केले त्या सर्वाचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मनापासुन आभार मानले आहेत. पुढील आठवड्यात म्हणजे १२ किंवा १५ तारखेपासून आपण पूर्ण जिल्हाभरात आभार दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सर्वच्या सर्व अकराही तालुक्यात जावून मतदारांची भेट घेऊन त्यांचे आभार मानणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात सोशल मिडियावर एका व्हिडिओ संदेशाद्वारे पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करत मतदारांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, माझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील समस्त कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. ज्या ज्या ठिकाणाहून तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न केले, प्रार्थना केल्या, माझ्यासाठी नवस बोलले, माझ्या यशाची कामना केली त्याबद्दल सर्वांचे आभार आणि त्या ६ लाख ७७ हजार मतदारांचेही मनापासुन आभार ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मला मतदान केलं. या देशामध्ये सर्वात कमी मतांनी निवडून आलेली जागा बीडची असेल आणि सर्वात कमी मतांनी पडलेली पहिल्या अथवा दुसऱ्या नंबरची माझी जागा असेल, म्हणजे इतकी टफ फाईट अत्यंत विपरित परिस्थितीत मी देऊ शकले ते केवळ आणि केवळ तुमच्या सर्वांच्या जीवावर…

मी लवकरच येत आहे, तुम्हाला भेटायला

पक्षाच्या बैठका असल्याने मी मुंबई, दिल्लीला जाईल, त्यानंतर मी १२ किंवा १५ तारखेपासून आभार दौरा करणार आहे. तुमच्या सर्वांपर्यंत मी येणार आहे. तुमचे आभार मानण्यासाठी आणि तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी! संघर्ष हा आपल्या जीवनात पाचवीला पूजला आहे. या संघर्षात न घाबरता आपण जो लढा दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा मला खूप खूप अभिमान वाटतो असंही पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे.

Tagged