देश विदेश

भारत-चीन सीमेवर 20 सैनिक शहीद

By Karyarambh Team

June 16, 2020

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर काल रात्रीपासून झालेल्या हिंसक कारवायांमध्ये भारताच्या बाजूच्या किमान 20 सैनिकांचा मृत्यू झाल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. चीनचे किमान 43 सैनिक जखमी किंवा मृत्युमुखी पडले असण्याची शक्यता आहे, असंही वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. पूर्व लडाख जवळच्या सीमा रेषेवर गेल्या महिनाभरापासून संघर्ष सुरू आहे. पण त्यावर चर्चेअंती सैन्य मागे घेण्याचा निर्णय झाल्यानंतरही काल रात्री दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये तुंबळ चकमक झाली. लडाखमध्ये गलवान खोर्‍यात दोन्ही प्रत्यक्ष ताबारेषेजवळ दोन्ही बाजूंचे सैनिक एकमेकांना भिडले. यात सुरुवातीला भारताचा एक कर्नल आणि दोन जवान शहीद झाल्याचं वृत्त होतं. त्याबद्दल औपचारिक निवेदन परराष्ट्र मंत्रालयाने संध्याकाळी जारी केलं. त्यात भारताचे किती सैनिक शहीद झाले याचा उल्लेख नाही. या निवेदनात म्हटलं आहे की, 15 जूनला संध्याकाळी आणि रात्री उशिरा चीनकडून आहे ती परिस्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न झाला. त्यातून दोन्ही सैन्याचा हिंसक सामना झाला. दोन्ही देशांचं यात नुकसान झालं. हे नुकसान वाचवता आलं असतं. सीमाप्रश्नी जबाबदार दृष्टिकोन भारताने नेहमीच ठेवलेला आहे. त्यामुळे भारतीय सैन्याची कुठलीही कारवाई ही प्रत्यक्ष ताबारेषेच्या भारतीय बाजूच्या हद्दीतच झालेली आहे. आम्हाला चीनकडूनही तशीच अपेक्षा आहे. सीमा क्षेत्रात शांतता राखण्याचा भारताचा प्रयत्न पहिल्यापासून आहे. आपसांतील वादांवर संवादाच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो, यावर आमचा विश्वास आहे. भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.