parali vidhansabha

परळीचा वैद्यनाथ कोणाला पावणार?

बीड

बालाजी मारगुडे । बीड
दि.6 : परळी विधानसभा मतदारसंघ हा 2009 मध्ये अस्तित्वात आला. त्यापुर्वी परळी हे लातूर जिल्ह्यातील रेणापूर मतदारसंघात समाविष्ट होते. आता परळी मतदारसंघात संपूर्ण परळी तालुका आणि अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर आणि घाटनांदूर या महसूल मंडळातीला गावांचा समावेश होतो. गोपीनाथ मुंडे gopinath munde यांनी सर्वप्रथम 1980 मध्ये रेणापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हापासून हा मतदारसंघ प्रचंड चर्चेत असतो. 1985 साली पंडितराव दौंड panditrao dound यांनी गोपीनाथराव मुंडे यांचा या ठिकाणाहून पराभव केला होता. नंतर 1990 पासून ते 2004 पर्यंत सलग चार पंचवार्षिक निवडणुकीत गोपीनाथराव मुुंडे यांनी विजय मिळवलेला होता. 2009 च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी स्व. मुंडे यांनी लोकसभेची निवडणूक लढवत केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला होता. नंतर या जागी त्यांनी आपली मुलगी पंकजाताई मुंडे pankajatai munde यांना येथून संधी विधानसभेवर जाण्याची संधी मिळाली. 2014 मध्ये पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे dhananjay munde हे दोघेही आमनेसामने आले. त्यात पंकजाताई मुंडे यांचा विजय झाला. 2019 मध्ये पुन्हा पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा समोरासमोर सामना झाला. यात धनंजय मुंडे यांनी पंकजाताई मुंडे यांचा 35 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. यावेळी या मतदारसंघातील चित्र वेगळे आहे. पंकजाताई मुंडे लोकसभेतील पराभवानंतर विधान परिषदेवर गेल्या. त्यामुळे धनंजय मुंडे यांना महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार आहे. अशावेळी त्यांच्यासमोर शरद पवार sharad pawar गटाकडून किंवा महाविकास आघाडीमधून काँग्रेस पक्षाकडून कोणाची तरी उमेदवारी येईल. लोकसभेत पंकजाताई मुंडे यांना मिळालेली 74834 मतांची लीड तोडायची कशी असाच पेच महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर असणार आहे. त्यामुळे यंदा परळीचा वैद्यनाथ कोणाला पावणार? याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत

MAHAYUTI
MAHAYUTI

महायुतीची काय आहे स्थिती?
महायुतीतील भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या तिघांच्या पक्षात ही जागा अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांच्यासाठी सोडली जाणार हे निश्चित आहे. धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे हे प्रमुख विरोधक सध्या एकत्र आलेले आहेत. त्यामुळे येथून महायुतीच्या उमेदवाराचे पारडे जड आहे. इथून दुसरा कोणीही स्पर्धक महायुतीमधून उमेदवारीच्या स्पर्धेत नाही.

MAHAVIKAS-AGHADI-LOGO
MAHAVIKAS-AGHADI-LOGO

महाविकास आघाडीची काय आहे स्थिती?
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस आणि शिवसेना (उध्दव ठाकरे) यांच्या पक्षात या जागेवर काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख यांनी प्रमुख दावेदारी केली आहे. याशिवाय शरद पवार गटाकडून सुदामती गुट्टे, sudamati gutte अ‍ॅड. माधव जाधव ad madhav jadhav, राजेभाऊ फड rajebhau fad, बबन गित्ते baban gitte ही मंडळी इच्छूक आहेत. धनंजय मुंडेंचे राजकीय प्राबल्य पाहता त्यांच्या विरोधकांपैकी तेवढा एकही तुल्यबळ उमेदवार आजतरी परळीत नाही.

MANOJ JARANGE
MANOJ JARANGE

मनोज जरांगे फॅक्टर परिणाम करेल का?
परळी मतदारसंघावर मनोज जरांगे पाटील यांचे विशेष लक्ष असणार आहे. स्थानिक मराठा उघडपणे बोलत नाही. परंतु तो मनोज जरांगेंच्या भुमिकेला पाठींबा देण्याची शक्यता आहे.

pankaja munde dhananjay munde
pankaja munde dhananjay munde

ओबीसी फॅक्टर परिणाम करेल का?
ओबीसी पक्षाचे टी.पी. मुंडे TP mundeयांनी निवडणुकीत उतरण्याची घोषणा केलेली आहे. परंतु परळीतील ओबीसी टी.पी. मुंडे यांच्या पाठीमागे जाण्याऐवजी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी जाईल, असे दिसते. ओबीसी फॅक्टरपेक्षा इथे धनंजय मुंडे फॅक्टर, वाल्मीकआण्णा कराड फॅक्टर, पंकजाताई मुंडे फॅक्टर चालेल.

धनंजय मुंडे दुसर्‍यांदा आमदार होण्याच्या तयारीत
पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे परळी मतदारसंघात पारडे जड आहे. शिवाय प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या आ. पंकजाताई मुंडे ह्याच मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी मत मागणार आहेत. परळीची निवडणूक विकासप्रश्नावर होण्याची शक्यताच नाही. धनंजय मुंडे हे मुरब्बी राजकारणी आहेत. परळीच्या लोकांना नेमकं काय हवंय हे त्यांना चांगलच ठावूक आहे. शिवाय वाल्मीकआण्णा कराड यांच्यासारखा ‘द बेस्ट’ पाठीराखानिवडणुकीचे नियोजन सांभाळणारा आहे. आजतरी धनंजय मुंडेंना परळीतून काही अडचण नाही. फक्त मराठा मतांसाठी धनंजय मुंडेंना मोठी कसरत करावी लागणार आहे. मुस्लिम आणि दलीत मतांची धनंजय मुंडे यांना अडचण येणार नाही. आर्थिक क्षमतेचा विचार केला तर बीड जिल्ह्यात जेवढे म्हणून उमेदवार निवडणुकीत एकूण खर्च करतील तितका खर्च एकट्या परळीत धनंजय मुंडे करतील.

राजेसाहेब देशमुखांना संधी मिळेल का?
गेल्या अनेक वर्षांपासून राजेसाहेब देशमुख हे काँग्रेस पक्षात काम करतात. त्यामुळे परळी विधानसभा काँग्रेसच्या वाट्याला यावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. यदाकदाचित काँग्रेसला परळी सोडण्यास पवार तयार नाही झाले तर देशमुख हे तुतारी चिन्हावर देखील निवडणूक लढतील अशी आजची स्थिती आहे. मराठा समाज ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. आजपर्यंत या मतदारसंघात एकदाही मराठा समाजाचा व्यक्ती आमदार झालेला नाही, हाच राजेसाहेब देशमुख यांचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार आहे. राजेसाहेब देशमुख धनंजय मुंडेंच्या बरोबरीने आर्थिक क्षमता ठेवून आहेत. पण तरीही पैसा किती खर्च करायचा यासाठी त्यांना एक लिमीट असणार आहे.

इतर उमेदवारांचा विचार होईल का?
सुदामती गुट्टे, अ‍ॅड. माधव जाधव, राजेभाऊ फड, बबन गित्ते हे देखील तुतारी चिन्हावर लढण्यासाठी इच्छूक आहेत. तथापि या सगळ्यात राजेसाहेब देशमुखांचे पारड जड आहे. बबन गित्ते हे धनंजय मुंडे यांच्यासाठी डोकेदुखी ठरले असते. परंतु एका खून प्रकरणात ते अडकलेले असल्याने तुतारीवाल्यांची अडचण झालेली आहे. राजेभाऊ फड हे देखील इच्छूक आहेत. तुतारीवाल्यांनी त्यांना उमेदवारी दिली नाहीतर ते अपक्ष लढतील अशी देखील शक्यता आहे. तीच शक्यता सुदामती गुट्टे यांच्या बाबतीत देखील वर्तविण्यात येत आहे. बाकी माधव जाधव तुतारीची उमेदवारी मिळाली तरच रिंगणात उतरतील असे दिसते.

Sharad Pawar
Sharad Pawar

शरद पवार फिल्डिंग लावणार
अजित पवार भाजपासोबत जाण्यात धनंजय मुंडे यांचाच मोठा वाटा आहे असे शरद पवारांना वाटते. धनंजय मुंडे यांनी अनेकदा उघडपणे शरद पवारांवर टोकाची टिका केली आहे. त्यामुळे शरद पवार हे देखील परळीच्या विधानसभा निवडणुकीत एकेरीवर येऊन प्रचार करण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडेंना मिळणारी ओबीसी, मुस्लिम आणि दलीत मतांचे विभाजन करणे हे प्रमुख लक्ष्य शरद पवारांचे असणार आहे. त्यासाठी दलीत समाजातून मोठा व्यक्ती रिंगणात उतरविणे, मुस्लिम समाजातून अनेक उमेदवार रिंगणात उतरविणे, ओबीसीमधून आणि खासकरून वंजारा समाजाचे आठ दहा उमेदवार रिंगणात उतरविण्याचे प्रयोग शरद पवार यांच्याकडून होऊ शकतात. असे झाले तर मंत्री धनंजय मुंडे यांना निवडणूक जड जाईल.

जात अन् गुन्हेगारी, प्रचारातील प्रमुख मुद्दे असणार
महायुतीकडून धनंजय मुंडे यांची उमेदवारी पक्की आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार आणखी नक्की नाही. परंतु धनंजय मुंडे यांना घेरण्यासाठी जात आणि परळीतील गुन्हेगारी हे दोन प्रमुख मुद्दे प्रचारात असणार आहेत.

आजपर्यंत रेणापूर/परळी मतदारसंघातून
निवडून आलेले लोकप्रतिनिधी
(रेणापूर विधानसभा मतदारसंघ)
1962 – गणपती आण्णा
1967 – ए.जी. गित्ते
1972 – रघूनाथ मुंडे
1978 – रघूनाथ मुंडे
1980 – गोपीनाथ मुंडे
1985 – पंडितराव दौंड
1990 – गोपीनाथ मुंडे
1995 – गोपीनाथ मुंडे
1999 – गोपीनाथ मुंडे
2004 – गोपीनाथ मुंडे
(परळी विधानसभा मतदारसंघ)
2009 – पंकजा मुंडे
2014 – पंकजा मुंडे
2019 – धनंजय मुंडे
2024 –??

कार्यारंभला काय वाटते?
परळीत धनंजय मुंडे यांचा पराभव करणे शक्य नाही. पद, पैसा, संगठण शक्ती, राजकारणातील खडा न् खडा माहिती, पंकजाताई मुंडे यांची साथ, वाल्मीकआण्णा कराड यांचे नियोजन भेदण्यासाठी एक स्ट्राँग उमेदवार इथे हवाय. इथे धनंजय मुंडेंविरोधात वातावरण तयार झालेच तर इथले सगळे चित्र निवडणुकीच्या आदल्या रात्री बदलण्याची क्षमता धनंजय मुंडे ठेवून आहेत. एखादा चमत्कारच इथे मुंडे विरोधकांना संधी देवू शकतो.

Tagged