maharashtra vidhansabha majalgaon

कुणीही या टिकली मारून जा! माजलगावात स्थानिकांपेक्षा उपर्‍यांनाच मिळाली सर्वाधिक संधी!!

बीड

बालाजी मारगुडे । बीड
दि.7 : माजलगाव मतदारसंघाला 1962 पासुनची राजकीय ओळख आहे. या मतदारसंघात फक्त तीन टर्म म्हणजेच 15 वर्ष स्थानिकच्या व्यक्तीला आमदार होण्याची संधी मिळाली. बहुतांश वेळा उपर्‍यांनीच माजलगावात आपले राजकीय बस्तान बसवले. यामध्ये फार तर सर्वात आधी 1980 मध्ये गोविंदराव डक, 1985 मध्ये मोहनराव सोळंके, 1990 मध्ये राधाकृष्ण होके पाटील यांना स्थानिकचे म्हणून मतदारांनी स्विकारले. श्रीपतराव कदम हे माजलगावचे पहिले आमदार पण ते बीडचे, सावळाराम त्रिभुवन हे देखील बाहेरचेच, बाजीराव जगताप हे देखील बीडच्या भवानवाडीचे, आताचे सोळंके कुटुंबिय हे देखील मोहखेडचे (मोहखेड हे गाव 2009 पर्यंत चौसाळा मतदारसंघात होते). तर आर.टी. देशमुख हे परळीचे. असा माजलगाव मतदारसंघाला बाहेरच्या उमेदवाराचा इतिहास आहे. आता माजलगावातून सोळंके कुटुंबियातून जयसिंह सोळंके यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. जयसिंह सोळंके यांचे कुटुंब मागील 30 वर्षापासून बीड येथे वास्तव्यास आहे. तर दुसरे प्रमुख दावेदार असलेले रमेश आडसकर हे देखील केजच्या आडसचे. त्यामुळे माजलगाव मतदारसंघात स्थानिकचा कोणी व्यक्तीच नाही. जे आहेत ते सगळे उपरे. जनतेनं ह्या सगळ्यांना इतक्या दिवस कसे काय स्विकारले हा देखील प्रश्नच आहे.

काय आहे महायुतीची स्थिती?
महायुतीमधील एकनाथ शिंदे, भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात ठरल्याप्रमाणे ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला ही जागा. त्याप्रमाणे या जागेवर पहिला हक्क अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा आहे. पण आता इथे विद्यमान आ. प्रकाश सोळंके यांनी निवडणुकीतून माघार घेत आपल्या पुतण्याला पुढे केले आहे. परंतु पुतण्याला या ठिकाणी विरोध होताना दिसत आहे. परंतु आ. पंकजाताई मुंडे ह्या आ. प्रकाश सोळंके उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. अन्यथा या जागेवर भाजपाकडून दावा केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपकडून दावा केला गेला तर प्रमुख उमेदवार कोण? हा प्रश्न आहे. विद्यमान स्थितीत भाजपचे विधानसभा प्रमुख मोहनराव जगताप हे प्रमुख दावेदार आहेत. परंतु लोकसभेत भाजपाच्या पंकजाताई मुंडे यांचा प्रचार करताना मोहन जगताप यांनी “लोक ऐकत नाहीत” हा केेलेला शब्दप्रयोग आता विधानसभेत तिकिट मागताना त्यांना ऐकवला जातोय. खुद्द पंकजाताईंनीच “लोक तुमचे ऐकत नसतील तर उमेदवारी कशी द्यायची?” हा सवाल केला आहे. तोच विषय रमेश आडसकरांच्या बाबतीत देखील सुरू आहे. आडसकरांनी अंग झटकून काम केले नाही. माजलगावपेक्षा केजमध्ये फटका बसला अशा तक्रारी आहेत. या तक्रारींमुळे पंकजाताईंची त्यांच्यावर खप्पा मर्जी आहे. पंकजाताई मुंडे यांच्याकडून सोळंके घराण्याव्यतिरिक्त विचार झालाच तर उद्योजक माधवराव निर्मळ, बाबरी मुंडे यांच्यासारख्यांची नावे पुढे येऊ शकतात. तर इकडे पालकमंत्री धनंजय मुंडे हे रमेश आडसकरांसाठी अनुकूल आहेत. आडसकर हे किंबहुना भाजपचं कमळ, नाहीच मिळालं तर मग राष्ट्रवादीची घड्याळ हातात बांधतील या चर्चा जोर धरीत आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा इथे दावा नाही.

काय आहे महाविकास आघाडीची स्थिती?
महाविकास आघाडीतील उध्दव ठाकरे सेनेचा इथे दावा नसणार आहे. काँग्रेसचेही इथे काही नाही. शरद पवारांच्या तुतारीची मात्र इथे जनमाणसात चांगली हवा आहे. मात्र तुतारीकडून ‘कुणीही या टिकली मारून जा’ असा प्रयोग केला तर तुतारी वाजणार नाही. सध्यातरी तुतारीला इथे पक्षाचे विधानसभा प्रमुख नारायण डक, माजी आ. राधाकृष्ण होके पाटील, डॉ. अशोक थोरात, डॉ. सुरेश साबळे, माजी जि.प. सदस्य चंद्रकांत शेजूळ, प्रा. ईश्वर मुंडे ही मंडळी इच्छूक आहेत. याशिवाय मोहन जगताप यांचे देखील नाव तुतारीच्या गटाकडून वरीष्ठ पातळीवर चर्चीले जात आहे.

MANOJ JARANGE
MANOJ JARANGE

मनोज जरांगे फॅक्टर चालणार का?
माजलगावात मनोज जरांगे फॅक्टर नुसता चालणार नाही तर तो पळणार आहे. फक्त मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार देताना पुर्णपणे राजकीय व्यक्ती देण्याऐवजी सर्व समावेशक चेहरा द्यायला हवाय. त्या उमेदवाराचें माजलगावात नैतिक, समाजिक अन् थोडंफार का होईना राजकीय वजन असायला हवं. खासकरून आ. सोळंके यांच्या मतांमध्ये जो व्यक्ती फूट पाडू शकतो तो व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांच्याकडून चालला जावू शकतो. असा उमेदवार कोण तर त्यातही वेगवेगळ्या चर्चा आहेत. सोशल इंजिनिअरिंग केले तर सहाल चाऊस sahal chaus, बाबुराव पोटभरे, मराठाच द्यायचा तर मग शिवाजीराव रांजवण shivaji ranjwan, नितीन नाईकनवरे nitin naiknaware, प्रा. प्रदीप सोळंके अन् तरूणांचा विचार करायचा झाला तर मग कितीतरी नावे सध्या माजलगावात चर्चेत आहेत. त्यापैकी असलेले मनोज जगताप, जगदीश फरताडे, राजेंद्र होके, डॉ. उध्दव नाईकनवरे, शहाजी सोळंके, रामचंद्र डोईजड, यासारखे कितीतरी जण मनोज जरांगे पाटलांकडून उमेदवारी मिळाली तर निवडणूक लढवू असे म्हणताना दिसत आहेत.

pankaja munde dhananjay munde
pankaja munde dhananjay munde

ओबीसी फॅक्टर परिणाम करेल का?
लोकसभेत मराठा-वंजारा हा वाद सुरू असतानाही मराठा बहुल गावातून देखील पंकजाताई मुंडे यांना किमान तीन आकडी मतदान आहे. तसं पाहिले तर माजलगाव मतदारसंघात मराठा-वंजारा हा प्रचार झालेलाच नाही. इथे मराठा आरक्षणाचं वारं मात्र सर्वाधिक आहे. तरीही माजलगावात चर्चा असलेल्या प्रमुख नावांपैकी सोळंके, जगताप, आडसकर ही कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार्‍या तिन्ही मातब्बर मंडळी मराठा आहेत. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांचा वेगळा उमेदवार अशी सगळी भर पडणार आहे. त्या तुलनेत ओबीसीमधून केवळ माधव निर्मळ आणि बाबरी मुंडे या दोनच नावांची चर्चा आहे. दोन्हीपैकी एकजण ब्रेक घेऊ शकतो. तसे झाले तर इथे ओबीसी उमेदवाराचा बोलबाला असणार आहे. मग माजलगावची लढत मनोज जरांगे पाटलांचा किंवा त्यांनी पाठींबा जाहीर केलेला उमेदवार आणि ओबीसी उमेदवार अशीच असणार आहे.

prakash solanke
prakash solanke

प्रकाश सोळंके –
प्रकाश सोळंके यांचे माजलगावातील वातावरण अतिशय खराब होते. सहा टर्म त्यांनी निवडणुका लढविलेल्या आहेत. पैकी चारवेळा त्यांनी विजय मिळवला. त्यामुळे मतदारसंघाचा मूड काय हे त्यांनी बरोबर ओळखले आणि वेळीच बाजुला होण्याचा निर्णय घेतला आहे. पुतणे जयसिंह सोळंके यांचे आज नाव पुढे आलेले असले तरी मतदारसंघात हे नाव जास्तीत जास्त दिड महिना चर्चेत राहील अशी देखील चर्चा आहे. त्यानंतर जयसिंह सोळंके यांना वाढता विरोध पाहता, आ. सोळंके यांच्याकडून ते स्वतः, पत्नी किंवा मग घरातील इतर सदस्यांना पुढे करण्याची शक्यता अधिक वाटते. जयसिंह सोळंके jaysinh solanke यांची राजकीय वारसदार म्हणून घोषणा झालेली असली तरी आ. सोळंके यांच्या स्नुषा अ‍ॅड. पल्लवी सोळंके pallavi solanke यांनी केलेली पोस्ट देखील चर्चेत आलेली आहे. सोळंके यांच्या घरात राजकारणात सक्रीय असलेले विरेंद्र सोळंके, मंगलताई सोळंके यांच्याकडून अद्याप या राजकीय वारसदाराच्या घोषणेबद्दल सोशलमीडियातून स्वागत झालेले नाही.

स्थानिकांना प्रमुख पक्ष बळच देत नाहीत
माजलगाव मतदारसंघात जिल्ह्याचे राजकीय गणित बघून उमेदवार दिले जातात. स्व. मुंडेंना मराठा लीडरची गरज म्हणून चौसाळा मतदारसंघातील सोळंकेंना इकडे लादले. नंतर परळीत मराठा मते हवीत म्हणून आर.टी. देशमुखांपुढे माजलगावचा ऑप्शन ठेवला गेला. नंतर रमेश आडसकरांची परळीत मते हवीत त्या बदल्यात माजलगावात त्यांना पाठविण्यात आले. आता लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणेंना डॉ.अशोक थोरात यांची गरज म्हणून त्यांच्यासमोर माजलगावचा ऑप्शन ठेवला गेला. इतकच नाही तर बीडचे जयदत्त क्षीरसागर यांनी देखील माजलगावमधून लढता येईल का याची चाचपणी करून पाहीली आहे. बजरंग सोनवणेंना मदत झाली म्हणून जयदत्त क्षीरसागरांना देखील माजलगावात पाठवले जावू शकते. परंतु यावेळी कोण्याही पक्षाने इथल्याच वतनदारांना किंवा माजलगाव मतदारसंघाच्या जडणघडणीत योगदान असलेल्या उमेदवारांचाच प्राधान्याने विचार करावा अशी मागणी आहे. अन्यथा सामाजिक समिकरणाबरोबर स्थानिकचा की उपरा या प्रश्नाचा देखील उमेदवाराला मोठा फटका बसू शकतो.

ramesh adaskar
ramesh adaskar

कशी आहे वेगवेगळ्या उमेदवारांची स्थिती
रमेश आडसकर – मागच्या पंचवार्षिकमध्ये रमेश आडसकर ramesh adaskar यांनी भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवलेली होती. त्यांचा 12000 मतांनी आ. प्रकाश सोळंके यांनी पराभव केला होता. पराभवानंतरही रमेश आडसकर माजलगाव मतदारसंघात सक्रीय आहेत ही त्यांची जमेची बाजू आहे. भाजपकडून उमेदवारी नाही मिळाली तर राष्ट्रवादीची घड्याळ अन् घड्याळही नाही मिळाली तर तुतारी फुंकण्याची तयारी. तिन्ही पक्ष नाही म्हणाले तर देशातल्या कुठल्याही अधिकृत राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी. पण यंदा हाबाडा द्यायचाच हा चंग बांधलाय. तुतारीच्या सर्वेमध्ये देखील यांचे नाव आहे.

mohan jagtap
mohan jagtap

मोहन जगताप – मोहन जगताप mohan jagtap यांची नेहमीच निवडणूक लढविण्याबाबत चर्चा होते आणि ऐनवेळी ते माघार घेतात. कुणाला तरी पाठींबा देवून त्यांचा प्रचार करतात अन् मतदानादिवशी त्यांची भुमिका वेगळीच असते. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा? असा प्रश्न सामान्यांना आहे. भाजपा पक्षाने त्यांना विधानसभेचं अध्यक्षपद दिले. ही त्यांच्यासाठी सोनेरी संधी होती. पण ती त्यांनी गमावली आहे. आता तुतारीकडून त्यांची चर्चा सुरू आहे. शरद पवारांकडून नाही जमले तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून जमवून आणायचे अशी जगतापांची तयारी आहे. तुतारीच्या सर्वेमध्ये देखील यांचे नाव आहे.

जयसिंह सोळंके – जसा आ. सोळंकेंचा मोठा राजकीय राजकीय वारसा पदरात पडलाय तशी आ. सोळंके यांच्याबद्दलची प्रचंड नाराजी देखील पदरात पडलेली आहे. पंधरा वर्षापासून राजकारणात सक्रीय आहेत. परंतु अद्यापही तरुणांचं संगठण जमविण्यात यश नाही. महायुतीबद्दल मतदारसंघात मोठी नाराजी आहे. त्यामुळे तुतारी चिन्ह मिळतंय का याची चाचपणी सुरू आहे. राजकीय शहाणपण, प्रगल्भतेचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. जनसंपर्काची वाणवा आहे. परंतु आता राजकीय वारसदार म्हणून घोषित झाल्यानंतर यात सुधारणा होईल का हे पहावे लागेल. माजलगाव कारखान्याने ऊस उत्पादकांचे न दिलेले पेमेंट ह्या विषयी मतदारसंघात मोठी नाराजी आहे. जयसिंह सोळंकेंना ही निवडणूक अजमावून पहावीच लागणार आहे. त्याशिवाय त्यांच्यात अजून काही टॅलेंट लपून राहीलंय का हे जनतेसमोर येणार नाही. मराठा आरक्षण प्रश्नामुळे पणाला लागलेले सोळंके घराण्याचे राजकीय अस्तीत्व जयसिंह सोळंके jaysinh solanke यांना वाचवायचे आहे. स्वतःला देखील सिध्द करून दाखवायचे आहे. थोडक्यात 6 बॉलमध्ये 60 रन काढण्याचे कठीण आव्हान जयसिंह सोळंके यांच्यासमोर आहे. तुतारीच्या सर्वेमध्ये देखील यांचे नाव आहे.

राधाकृष्ण होके पाटील radhakrushn hoke patil – तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची दांडगी ईच्छा बाळगून आहेत. 1990 साली त्यांनी नारायण डक यांचा पराभव करून विधानसभा गाठली होती. 1995 साली पराभव झाल्यानंतर त्यांनी 2013-14 मध्ये माजलगाव बाजार समितीचे सभापतीपद भुषविलेले आहे. या व्यतिरिक्त राजकारणात मोठा गॅप आहे. परंतु माजलगावचे स्थानिक वतनदार म्हणून मोठा दबदबा आहे. तुतारीच्या सर्वेमध्ये त्यांचे नाव आहे.


नारायण डक narayan dak- 1990 साली माजलगाव विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवलेली होती. त्यात ते दुसर्‍या क्रमांकावर राहीले. परंतु त्यानंतर सक्रीय राजकारणातून स्वतःला दूर ठेवले. अजित पवारांनी शरद पवारांविरोधात बंड केल्यानंतर शरद पवारांच्या प्रेमापोटी पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाले आहेत. तुतारी मिळाली तर वाजवायची नाही मिळाली तर तुतारीचा उमेदवार विजयी करायचा असां चंग त्यांनी बांधलेला आहे. तुतारीच्या सर्वेमध्ये त्यांचे नाव आहे.

डॉ. अशोक थोरात ashok thorat- माजी आरोग्यमंत्री स्व. डॉ. विमलताई मुंदडा यांचे स्वीय सहायक ते बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून ते जिल्ह्यात ओळखले जातात. पॉलटीकल मॅनेजमेंटचा दांडगा अनुभव. बीड लोकसभेसाठी शरद पवारांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांची भेट घेतली होती. परंतु त्यावेळी बजरंग सोनवणेंचे नाव पुढे आल्यानंतर पवारांनी माजलगाव विधानसभेसाठी तयारी करा, असे सांगितल्याने ते माजलगावातून इच्छूक आहेत. तुतारीच्या सर्वेमध्ये त्यांचे नाव आहे.

डॉ. सुरेश साबळे suresh sabale – पॉलटीकल मॅनेजमेंटमध्ये नेहमीच निर्णायक भुमिका बजावणारे डॉ. सुरेश साबळे हे बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक असताना केलेल्या कामाच्या जोरावर ते मतदार संघाला परिचित आहेत. साम, दाम, दंड अशी क्षमता ते ठेवून आहेत. तुतारीकडून उमेदवारी मिळावी म्हणून जयंत पाटील, शरद पवारांच्या अनेकदा भेटी. पवारांनी त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. तुतारीच्या सर्वेमध्ये त्यांचे नाव आहे.

चंद्रकांत शेजूळ chandrakant shejul – जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. तरूण तडफदार म्हणून ओळख आहे. तत्कालीन आ. आर.टी. देशमुख यांच्या मुलाचा पात्रूड जिल्हा परिषद गटातून पराभव केल्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले होते. बीड लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराची माजलगावची धुरा शेजूळ यांच्या खांद्यावर होती. परंतु मतदारसंघात अपेक्षीत यश न मिळाल्याने त्यांचे नाव जरा मागे पडले आहे. तथापि तुतारीच्या सर्वेमध्ये त्यांचे नाव आहे. बजरंग सोनवणे त्यांना पाठींबा देतील, अशी शक्यता आहे. स्थानिकचे आबेगाव येथील वतनदार आहेत.

शिवाजीराव रांजवण shivajirao ranjwan – माजलगावच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रीय. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सोनाजीराव रांजवण यांचा राजकीय वारसा त्यांना लाभलेला आहे. आ. प्रकाश सोळंके यांच्या राजकीय करिअरमध्ये त्यांचा मोठा वाटा. तथापि मागच्या सहा वर्षापासून आ. सोळंके अन् सोळंके त्यांचे बिनसल्याने सध्या ते डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्यासोबत काम करतात. माजलगावचे नगरसेवक या राजकीय पदाशिवाय तालुक्यात असलेल्या शैक्षणिक संस्था, मल्टीस्टेट, दैनिक कार्यारंभ या दैनिकाचे संपादक तथा माजलगावचे वतनदार, शांत, संयमी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. माजलगावात आरक्षण प्रश्नावरून जाळपोळ झाल्यानंतर अनेक निरपराध तरुणांची नावे राजकीय द्वेशातून गुंतविण्यात आली होती. अशावेळी सर्वात आधी या तरूणांसाठी वर्तमानपत्रातून आवाज उठविण्याचं काम. मराठा आरक्षण प्रश्नासाठी पुरक भुमिका. मनोज जरांगे पाटील, तुतारी किंवा भाजपा कोणाहीकडून निवडणूक लढविण्याची तयारी.

सहाल चाऊस sahal chaus – मुस्लिम समाजाचा तडफदार चेहरा. मुस्लिम आणि दलित मतांची मोट बांधून असलेले चाऊस साडेतीन वर्ष माजलगावचे नगराध्यक्ष राहीलेले आहेत. सातत्याने ते माजलगाव नगर परिषदेत निवडून जातात. अजित पवार, शरद पवार, जयंत पाटील यांच्यासारखे नेते चाऊस यांना नावानिशी ओळखतात. मराठा, ब्राम्हण, मारवाडी समाजामध्येही चाऊस चांगले संबंध ठेवून आहेत. राज्यातील मोठ मोठ्या राजकीय नेत्यांसोबत नेहमीच उठबस असते. माजलगावचा लोकप्रतिनिधी निवडण्यात निर्णायक भुमिकेत असतात. मनोज जरांगे पाटलांच्या पाठींब्याने मैदानात उतरण्याची तयारी. स्थानिकचा चेहरा अशी त्यांची जमेची बाजू.

नितीन नाईकनवरे nitin naiknaware – आ. प्रकाश सोळंके यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलेले. माजलगाव बाजार समितीचे अनेक वर्ष सभापतीपद भुषवून बाजार समिती नावारुपाला आणली आहे. सध्या भाजपा या पक्षात काम करीत असले तरी आडसकर यांच्यापासून चार हात लांब तर सोळंके यांच्याशी जवळीक असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. माजलगाव नगराध्यक्षपदाची जनतेतून निवडणूक लढवलेली पण त्यात यश आले नाही. आ. सोळंके यांनी जयसिंह सोळंके यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर ते सोळंके यांच्याशी जुळवून घेण्याची शक्यता दिसत नाही. भाजपा अथवा मनोज जरांगे पाटलांच्या पाठींब्याने निवडणूक लढविण्याची तयारी.

डॉ.ओमप्रकाश शेटे omprakash shete – मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाच्या माध्यामातून देवदूत बनलेले डॉ. ओमप्रकाश शेटे 2014 पासून माजलगाव मतदारसंघात सक्रीय आहेत. लोकहिताच्या कामाला प्राधान्य देणारा माणूस अशी त्यांची ओळख आहे. जातीपातीच्या राजकारणात स्वतःला अडकवून न ठेवता जातविरहीत प्रतिमा तयार केलेला स्वच्छ चारित्र्याचा माणूस. जबरदस्त वर्क्तृत्व, रुग्ण सेवेच्या माध्यमातून प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचलेला चेहरा. भाजपकडून उमेदवारी मिळाली तर लढण्याची तयारी. परंतु पंकजाताई मुंडे यांच्याशी त्यांचे सूत्र जमत नाहीत ही त्यांची नकारात्मक बाजू. अन्यथा जातीपातीच्या राजकारणात सर्वसमावेशक चेहरा म्हणून अचानकपणे पुढे येऊ शकतात.

बाबरी मुंडे babari munde – गेल्या अनेक वर्षापासून भाजपासोबत एकनिष्ठ. तरूण तडफदार चेहरा. सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांची कामे करणारा वडवणीचा तरूण. पॉलटीकल मॅनेजमेंटचे जबरदस्त ज्ञान. आई वडवणीच्या माजी नगराध्यक्ष, बहीण जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य, वडील जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, स्वतः जिल्हा बँक संचालक. असा राजकीय वारसा स्वतः चालवत आहेत. मराठा ओबीसी अशी निवडणूक झाली तर मराठा मतांच्या विभाजनात अलगद विधानसभेवर पोहोचतील. तिकिट मिळाले तर भाजपकडून नाहीतर अपक्ष लढण्याची देखील तयारी.

माधव निर्मळ madhav nirmal – धारूर येथील उद्योजक. धनगर समाजाचा चेहरा म्हणून लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी यंत्रणा राबवली. भाजपकडून तिकिट मिळण्याची आशा बाळगून आहेत. पंकजाताई त्यासाठी त्यांना मदत करतील, असे दिसते. निवडणूक प्रचार जातीवर झालाच तर मराठा मतांच्या विभाजनात ओबीसींच्या एकगठ्ठा मतांवर निवडून येण्याची शक्यता.

बाबुराव पोटभरे baburao potbhare – आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नाव म्हणून बाबुराव पोटभरे यांची ओळख आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा समाजाच्या बाजुने भुमिका. मनोज जरांगे पाटलांच्या सोशल इंजिनीअरिंगच्या प्रयोगात बाबुराव पोटभरे प्रयत्न करण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण प्रश्नामुळे माजलगावात जाळपोळ झाल्यानंतर मराठा तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर देण्याचे काम केले.

अरूण राऊत arun raut – गेल्या अनेक वर्षापासून माजलगाव भाजपाचे तालुकाध्यक्ष म्हणून काम केले आहे. स्व.मुंडे साहेबांपासून ते आता पंकजाताई मुंडे यांच्यापर्यंत भाजपासोबत. भाजपच्या बूथ यंत्रणेमुळे माजलगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचे जवळचे नाव. गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचे काम करीत असताना कुठलीही संधी वाट्याला न आलेला माणूस. यावेळी भाजपने आपल्याला उमेदवारी द्यावी म्हणून प्रयत्न करीत आहेत.


कार्यारंभला काय वाटते?
महायुतीकडून माजलगाव विधानसभा लढविण्यासाठी जे प्रमुख चेहरे आहेत त्या चेहर्‍यांना महायुतीतील त्यांच्या पक्षाकडून वेगवेगळ्या कारणांमुळे तिकिट मिळण्याची शक्यता दिसत नाही. तर इकडे तुतारी प्रमुख लढत देईल अशी शक्यता वाटते पण त्यांच्याकडे प्रभावी चेहरा नाही. ‘दात आहेत तर चणे नाहीत अन् चणे आहेत तर दात नाहीत’, अशी एकंदरीत स्थिती आहे. माजलगावात मनोज जरांगे पाटील यांना मानणारा मराठा समाज आहे. परंतु जरांगे पाटलांचा उमेदवार एकट्याने लढत देवू शकत नाही. जरांगे पाटील आणि तुतारीवाले एकत्र आले तरच त्याचा दोघांनाही फायदा होईल. अन्यथा मतविभाजन होऊन महायुती किंवा ओबीसीचा प्रभावी चेहरा येथून निवडून येईल.

आजपर्यंत माजलगावातून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी
1962 – श्रीपतराव कदम
1967 – सावळाराम त्रिभुवन
1972 – सावळाराम त्रिभुवन
1978 – सुंदरराव सोळंके
1980 – गोविंदराव डक
1985 – मोहनराव सोळंके
1990 – राधाकृष्ण पाटील
1995 – बाजीराव जगताप
1999 – प्रकाश सोळंके
2004 – प्रकाश सोळंके
2009 – प्रकाश सोळंके
2014 – आर.टी. देशमुख
2019 – प्रकाश सोळंके
2024 – ???

Tagged