परळीत रस्त्याच्या दुतर्फा नजर पुरणार नाही तिथवर बाप्पांचे गगनचुंबी हूड लागले होते. मागच्या बारी लागलेले हूड अंधारात दिसायचे नाहीत. त्यामुळे अपघात व्हायचे. त्यावर पत्रकारांनी लैच टिका केली म्हणून बाल्मिकान्नांनी याबारी हुडचे अपडेट व्हर्जन आणत त्याला लाईट बसवून घेतल्या. सार्या परळीत या हुडचा उजेडच उजेड पडला होता. बाप्पांचा मुषक उल्साकपण नाराज व्हायला नको म्हणत याबारी मुषकाचे देखील खास हूड लागले होते. आपले हूड पाहून मुषक जोरजोरात नाचायलाच लागला. तेवढ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या धनुभौची एन्ट्री झाली. आल्या आल्याच त्यांनी मुषकाची गळाभेट घेत वाकून नमस्कार करीत बाप्पांचा हात धरून त्यांना आपल्या लाल किल्ल्यावर आणले.
बाप्पांचा पाय लाल किल्ल्याच्या चौकटीला लागणार तेवढ्यात बाल्मिकआण्णांनी आवाज केला. “ऐऽऽऽ गणेश ते बाप्पाचं पाय धुवायचं आण” गणेश धावतपळत आतल्या केबीनमध्ये गेला. त्यानं एक तांब्याच्या धातुचं ताट, तांब्या अन् घंगाळू आणलं. बाल्मिकआण्णा पुन्हा जोरात ओरडले. “आरे गाबड्या ते नै… चांदीचं ताट, ताब्या घंगाळू आण”. लगोलग सगळं चांदीचं साहित्य आलं. बाप्पानं मुषकाकडे कटाक्ष टाकला. मुषक मनातल्या मनातच म्हणले “ये तो ट्रेलर है…” धनुभौच्या हस्ते बाप्पांची चांदीच्या घंगाळूत पाद्यपुजा झाली. खास हैद्राबादी 25 किलो वजनाचा बुके देवून बाप्पांचं स्वागत झालं. बाप्पांच्या डोक्यावर चाळीस तोळ्याचा सोन्याचा मुकूट चढवण्यात आला. मुषकाच्या बोटात अंगठ्या सरकवल्या गेल्या. खास खुर्चीवर रेशमी वस्त्र अंथरून त्यावर बाप्पांना बसण्याची विनंती झाली. कलेक्टर एसपींना खास फोन गेले. त्यांनी धावत येऊन परळीत सॅल्यूट ठोकला. तोवर बाल्मीकाण्णांनी जवळच्या 6 हॅन्डसेटमधील 12 सीमकार्डवरून परळीतल्या व्यापार्यांना निरोप धाडले. निरोप मिळायचा अवकाश व्यापारी लाल किल्ल्यावर हजर. बैठक बसली, बाल्मिकान्नांनी त्यांना सुचना केली. “बाप्पा सगळ्या परळीत हिंडणार हैत. त्यामुळे उद्यापासून कुणी थर्मलची राख उचलायची नै. पुढचे नऊ दिवस परळीत प्रदुषणमुक्ती. कसलाही काडीकचरा दुकानाच्या भायेर पडणार नै. तुमचं ज्या कशाचंबी दुकान असंन त्या दुकानातील साहित्याची कमान भायेर लागली पाहिजे. सोन्या चांदीवाल्यांनी अजिबात काळजी करायची नै. जिल्ह्यातल्या सगळ्या ठाणेदारांना परळीत ड्यूटी लावली है. वरतून सगळ्या शहरात कैमरे बसविले हैत. त्यामुळे सोनारांनी सोनं लावा, चांदी लावा. भांड्यावाल्यांनी भांडे अडकवा. कुंभारानं मडके लावा. साड्या कपड्या वाल्यांनी कपडे लावून कमानी उभारा”. मुख्यमंत्री लाडकं माझं शहर योजना लागू झाली तर परळी राज्यात एक नंबर यायला हवी” आण्णानं हुकूम सोडल्याबरूबर सगळी परळी टाईट झाली होती. बाल्मिकाण्णांनी पुन्हा आवाज दिला. “त्यो सोलापुरचा निसर्ग धाब्यावाला आचारी कुठैय” नाव घेताच तोही हजर झाला. “हे बघ बप्पाला जेवढ्या प्रकारचे मोदक आवडतेत ते सगळे कर. गुजरातच्या अमूल डेअरीतून इमानानं दूध मागवं. अजून काय आवडतंय, नाय आवडत हे बघून घे. कसलीही शिकायत नकू मला. अन् जेवण फक्त चांदीच्या ताटातच झालं पाहीजे बघ. धनुभौ, पंकुताई, बाप्पा आणि मुषक येवढ्या चारच लोकांसाठी तू जेवण बनवायचं. बाकी परळीसाठी हैद्राबादचा आचारी आणलाय. उद्या बप्पाची जंगी अन् अतिभव्य मिरवणूक निघली पाह्यजे. परळीत जेवढ्या म्हणून मोटारसायकली हैत त्या सगळ्या पेट्रोल टाकून फुल्ल करा. गंगाखेड डेपू, अहमदपूर डेपू, लातूर डेपू, अंबाजोगाई डेपू अन् परळी डेपुच्या जितक्या एष्ट्या हैत त्या सगळ्या बूक करून माणसं आणायला धाडा. अख्ख्या मतदारसंघाला उद्या चुलबंद म्हणून सांगा. आलेल्या बायकांना साड्या वाटा. म्हातार्यांना लुगडे द्या, लेकरांना कपडे घ्या. म्हातार्यांना पटके घाला. आपल्या लेकीचं लगन है असं समजून सगळ्यांनी कामाला लाग” ‘जी अण्णा’ म्हणून आण्णांची सगळी यंत्रणा कामाला लागली. इकडे बाप्पांनी धनुभौला इच्चारलं. “ह्यो आण्णा म्हंजी अजबच रसायन दिसतंय… मित्र पाहिजे तर असा’ त्यावर धनुभौनं आण्णाकडं पाहून बाप्पाला एक हिंदी शेर ऐकवला
“बेवजह है तभी तो दोस्ती है, अगर वजह होती तो व्यापार होता”.
“वाह वा वाह वा” म्हणत दोघांच्या गप्पात मुषकानं एन्ट्री घेतली. “धनुभौची यंदा लक लागलीय. कोण म्हंजी कोणच यंदा त्यांना इरोधक नाय. दोन दोन बहीणी धनुभौचा यंदा प्रचार करणार हैत. सगळ्या परळीची बाल्मिकान्नांनी मशागत करून ठेवलीयें. लाख पन्नासेक हाजाराने भाऊची शीट लागल्यात जमाय. पण भाऊची गाडी मराठा आरक्षणामुळे कच खातीय. धड कुस्ती लागत पण नै अन् सुटत पण नै. कालच भौला आंतरवालीहून फोन आल्ता. निमित्त झालं शेतीचं पण भौमध्ये अन् आंतरवालीत संवाद झाला. त्यामुळे तरी जरा काळवंडलेलं आभाळ हलकं हलकं झालंय. भौनं त्येन्ला सांगून टाकलं. म्हवं अन् कोण्या समाजाचं भांडण नाय. पण परळीतून कुणीतरी आंतरवालीत येतंय. काडी लावतंय अन् बसतंय शेकत. आता सरकारमधी आरक्षणाच्या प्रश्नावर ‘वॉटर मेलॉन’ कुणाचं काही चालूच देत नै त्येला धनुभौ काय करणार म्हणा… आजच ते परळीत घोंगडी आथरणार हैत म्हणं. धनुभौनं सांगितलं काय घोंगड्या लागतील तेवढ्या लागू द्या, माणूस जमीनीवर बसाय नको. स्वागताला कशाचीच कमी पडायला नकू… पण तिकडून काय प्रतिसाद नाय बघा…त्यामुळे गडी चिंतातूर झालाय”
मुषक बरंच काही सांगत व्हता. बाप्पांना पुढचा प्रवास असल्याने निरोप घेणं गरजेचं होतं. बाप्पांनी धनुभौला कोपर्यात नेलं. अन् ‘माजलगावचं काय?” असा प्रश्न केला. धनुभौनं हसत-हसत आपल्या हाताने ‘प्रकाश’ कंदील मालवत ‘कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे है’ म्हणत आडसकडे बोट दाखवले अन् डोळ्यांनी धारूरकडे इशारा केला. बाप्पांना हा इशारा कळला. मुषकाने “चला बाप्पा ‘निर्मळ’ डोळ्यांना ‘हाबाडा’ बसण्याआधी ‘प्रकाश’ पडायच्या आत आपण निघू म्हणत तिथून दोघांनीही कल्टी मारली.
- बालाजी मारगुडे, बीड
मो. 9404350898
मुषकराज पर्व 5 वे भाग 3