धारूरचा घाट उतरताच मुषकाने बाप्पांना वैष्णो देवी दर्शनाचा आग्रह केला. तसे दोघे तेलगाव कारखाना परिसरात असलेल्या वैष्णोदेवी मंदिराजवळ आले. मंदिराच्या आतला दिवा ढणढण जळत होता. दिव्याच्या उजेडात एक सव्वा क्विंटलचा माणूस दोन माणसांच्या खांद्यावर हात देवून एका ट्रॉफीकडे टकमक बघत उभा होता. आपलाच भार त्यांना आता सहन होत नव्हता. मुषकाची स्वारी त्यांच्याजवळ जाताच मुषकाने त्यांना गदागदा हलवले. तसे ते भानावर आले. समोर बाप्पांना पाहताच त्याने बळच नमस्कार करावा तसा नमस्कार केला.बाप्पाने मुषकाचा पाय दाबत विचारले “हा कसला नमस्कार बिन बुलाये महेमान सारखा’. त्यावर मुषक म्हणाले, “इथं असाच नमस्कार अस्तो. तुम्ही लाल किल्ल्यावरून लै आदर सत्कार, पाहुणचार करून आले म्हणून तुम्हाला जाणवत असेल. पण गेल्या 30 वर्षापासून हिथल्या लोकांना ह्यांच्या कोरड्या पाहुणचाराची सवय झालीये. तरी तुमचं नशिब म्हणायचं खेकसून विचारलं नै तुम्हाला…”“बरं मी काय म्हणतो उजेडदादा ही कसली ट्रॉफी जितून आणलीय तुम्ही?” मुषकाच्या प्रश्नावर खेकसतच उजेडदादा बोलू लागले “इथल्या जन्तेचं हे प्रेमंय. मप्ल्या मतदारसंघातले अनेक इचूकाड्याचे प्रश्न मी मार्गी लावले. टक्केवारी बंद केली. माझ्यासाठी म्हणून काहीच केलं नाही. केलं ते फक्त जंन्तेसाठी. (बाप्पा अन् मुषक दोघेही एकमेकांकडे पाहून हळूच हसू लागतात) त्यासाठी सभागृहात भाषणं ठोकली. आमाला शेरोशायरी येत नस्ली म्हणून काय झालं? शेवटी प्रश्न मांडणं इंम्पॉर्टंट. बिना शेरोशायरीचा उत्कृष्ट भाषण पुरस्कार जितलाय मी. तवा ही ट्रॉफी मिळालीय” हे ऐकून बाप्पांनी खुष होऊन परळीत घातलेला 40 तोळे सोन्याचा मुकूट काढून उजेडदादांच्या डोस्क्यावर चढवला. मुकूट खरंच सोन्याचाच आहे याची खात्री झाल्यानंतर उजेडदादांनी साखर कारखान्यात दोन कप चहाची ऑर्डर केली.एवढ्यात संजय दत्त सारखे दिसणारे छोटे विरूदादा दाखल झाले. उजेडदादांनी आपल्या कर्तबगार लेकाची बाप्पांना ओळख करून देत ‘पोरगा अस्खलीत इंग्रजी बोलतो, लै मेहनती, लै हुश्शार’ असल्याचे सांगितले. “सध्या कारखाना हाच सांभाळतोय” म्हणत त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली. तोच मुषकाने बाप्पाच्या कानाजवळ येत सांगायला सुरूवात केली. “कोणाच्या तरी नव्या बुलेटचा माजलगावात विरूदादाच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले होते. विरूदादा एकटे ट्रायल मारतो म्हणून जे बुलेट घेऊन गेले ते तुळजापूरच्या देवींच दर्शन घेऊनच माघारी आले. “हे कैच नै. एका शेतकर्याचा आंबा विरूदादांनी खाल्ला. विरूदादाला ते आंबे भलतेच आवडले. मग काय विरूदादांनी आंब्याच्या झाडासाठी जमीनच घेऊन टाकली” आता मात्र बाप्पांनी कपाळावर हात मारून घेतला.तितक्यात जैयभैय्याची एन्ट्री झाली. मुषकाने त्यांचाही परिचय करून द्यायला सुरूवात केली “उजेडदादांची जागा आता जैयभैय्यांना मिळणार है. तशी घोषणा उजेडदादांनी करून टाक्ली है. घोषणा करून दिड महिना झाला पण ह्यांचा पाहीजे तसा उजेड अजून मतदारसंघात पडला नै. राहतेत बीडला, अन् आमदार व्हायचंय माजलगावचं. सत्तर दोनी एकशे चाळीस किलोमीटरचं अंतर कापण्यातच अख्खा दिवस जातोय. त्यामुळं त्यांचं आमदारकीचं गणित काय बसण्याचा वाण दिसत नै. कार्यकर्त्यांचा लवाजमा संगं लागतो. त्यासाठी चाढ्यावरच्या मुठीला ढील द्यावी लागते. तवा कुठं कार्यकर्ते पाखरानं दाणे टिपायला जवळ यावं तसं येत्यात. उगी रिकामी माती कोण उकरणार? लोक तर म्हणत्यात ते तुतारी घेणार. लोकांचं जावू द्या, ‘दादांनी इतकं सगळं दिलंय तरीबी तुतारीच म्हणणार का?’ असा त्येंच्या घरूनच पालवी फुटल्यागत सवाल झाल्ता”मुषक बोलत असतानाच कोण्या बाईमाणसाचा खाकरण्याचा आवाज आला. त्याबरोबर उजेडदादा एकदम चिडीचूप बसले. त्यावरून उजेडदादांच्या गृहमंत्र्यांचा ताफा आल्याचे बाप्पांना जाणवले. बाप्पांनी मागे वळून पाहीले. एक बाई ‘सून माझी लाडकी’ म्हणत आपल्या सुनेला घेऊन तिथे दाखल झाली. मुषकाने या मंगलाताई, या पल्लवीताई म्हणत सासू सुनांची ओळख करून दिली. “दादांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली असली तरी त्यांची जागा नेमकी कुणाला द्यायची याचा निर्णय आमच्या घरात बहुमताने होईल”, असे मंगलताईंनी आल्याआल्याच बजावले. मुषकाने लागलीच मनातल्या मनात 18 वर्षाच्या पुढची जनगणना सुरू केली. 6 विरूध्द 4 असा निकाल कोणाच्या पारड्यात हे स्पष्ट झाले होते. मुषकाने टूणकून दादांच्या पुढ्यात येत त्यांच्या डोेस्क्यावर चढवलेला सोन्याचा मुकूट काढला अन् तो पल्लवीताईच्या डोक्यावर चढवला. मंगलताईंनी टाळ्या वाजवून याचं स्वागत केले. पण पल्लवीताईंनी सोन्याचा मुकूट घेण्यास नम्रपणे नकार देत ‘फैसला जनतेच्या न्यायालयातच होऊ द्या’ म्हणत आपल्याला फुकट काय नको, म्हणत बाप्पांना आपली ओळख करून दिली. इकडे मघापासून ढणढण जळणारा दिवा आता फडफड करू लागला होता. हे पाहून पल्लवीताई पुढे सरकल्या आणि त्या फडफडणार्या दिव्यात तेल घालत तो विझणार नाही याची खबरदारी घेतली.इकडे बाप्पा मंदिरातून कधी एकदा बाहेर येतात याची वाट पाहत धारूरचा इसम घोंगडी अंथरून बाहेरच बसला होता. बाजुलाच हाबाडा फेम इसम ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ हे गाणं हेडफोन लावून ऐकत होता. तिकडून डोंगराच्या कपारीकपारीनं ‘कोण आला रे कोण आला वडवणीचा वाघ आला’ म्हणत तरुणांचा मोठा घोळका मंदिरापाशी येऊन थांबला. तोपर्यंत माजलगावहून तुतारी हाती घेत ‘नारायण नारायण’ करीत एक ‘बदक’ देखील दाखल झाले होते. कोणीतरी भाई बाप्पांची गाडी अडविण्यासाठी रास्ता रोको करण्याच्या तयारीत होते. तर एकाने आई तुळजाभवानीची शपथ खाऊन पुन्हा एकदा मैदान मारणार अशी मन ‘मोहून’ टाकणारी घोषणाच दुसर्यांदा करून टाकली. तोपर्यंत माजलगावचे पाटील आले. आंतरवालीच्या पाटलांचे मावळे देखील हजर झाले. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरहून एक वकील देखील माजलगावच्या दिशेने निघाले होते. मंदिराबाहेर घोषणा दिल्या जात होत्या “कस्सं पाटील म्हणतेल तस्सं”
बालाजी मारगुडे । बीड9404350898मुषकराज पर्व 5 वे भाग 4