आ. लक्ष्मण पवार उद्विग्न ः निवडणूक न लढविण्याचा निर्णय
बीड, दि.12 : महायुतीतील पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेवराई भाजपाचे आ. लक्ष्मण पवार यांनी थेट पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करीत आपण किंवा आपल्या कुटुंबातील कोणीही निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अॅड. यांनी पालकमंत्र्यांवर आरोप करताना म्हटले की एक चांगला तहसीलदार, एक चांगला बीडीओ, एक चांगला पोलीस अधिकारी गेवराईला द्या, एवढंच मागीतलं होतं. पण तेही मिळालं नाही. पालकमंत्री ऐकत नाहीत. त्यामुळे राजकारण तरी कशाला करायचं असा उद्विग्न सवाल त्यांनी केला. एका स्थानिक दैनिकाला भेट दिल्यानंतर त्यांनी आपल्या मनातील खदखद अशाप्रकारे बाहेर काढल्याने महायुतीच्या घटकपक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.आ. लक्ष्मण पवार म्हणाले, सध्याच्या राजकारणाची मला किळस येत आहे. मागच्या दहा वर्षापुर्वी जे राजकारण होते ते आता राहीलेले नाही. ज्या दिशेने राजकारण जात आहे ते मनाला पटत नाही. नैतिकतेला बरे वाटत नाही. त्यामुळे आपणच बाजुला झालेले बरे. म्हणून मी हळूहळू मनाला न पटणार्या गोष्टीतून बाजुला जात आहे. वरचे बळ देणारे असतील तर गतीने काम करता येते. पण आता तशी परिस्थिती राहीली आहे का? असा सवाल देखील त्यांनी केला. मला पक्षाने अजून उमेदवारी संदर्भात विचारलेले नाही. पक्षाने विचारणा केली तर मी माझे म्हणणे पक्षश्रेष्टींसमोर मांडेल. जनतेला न्याय देवू शकत नसेल तर आपण पदावर राहू नये, असे माझे प्रामाणिक मत आहे. एखादी परिक्षा देताना अभ्यास करावा लागतो. आणि मग पेपर द्यावा लागतो. अभ्यास करायला वेळच न देता परिक्षा द्या म्हणणे चुकीचे नाही का? विचारणा झाली तर पक्षासमोर या गोष्टी मी सहज बोलणार्यांपैकी आहे, असेही पवार म्हणाले. मी दलबदलू नाही, मी इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही. ज्या पक्षाने आपल्याला संधी दिली त्या पक्षाशी गद्दारी करणार्यांपैकी मी नाही. नाराजी जरूर आहे. परंतु पक्ष सोडणार नाही. विनाकारण वेगवेगळ्या चर्चा करण्यात अर्थ नाही, असेही आ. पवार म्हणाले.पुढे बोलताना आ. लक्ष्मण पवार म्हणाले, मी अनेक विषय पक्षश्रेष्ठींसमोर वारंवार मांडत आलो आहे. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. दोन अडीच वर्षापुर्वी आम्ही सत्तेत आलो. तीन पक्षाचं सरकार आलं. खूप काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत. गेवराई मतदारसंघाचा मी आमदार आहे, माझ्या मताला काही किंमत आहे की नाही? मी ज्या भुमिका घेत आहे त्या जनतेचं प्रतिनिधीत्व करणार्या आहेत. जनतेच्या व्यथा मांडण्याची जबाबदारी माझी आहे की नाही? हा प्रश्न मला कधी कधी पडतो. गेवराईमध्ये कोणीही एक चांगला तहसीलदार द्यावा अशी माझी मागणी होती. मी सांगतो तोच द्या असे माझे म्हणणे नव्हते. फक्त चांगला द्या अशी मागणी होती. परंतु गेवराईत जेवढे तहसीलदार आले ते सगळे वाळू वाल्यांशी संगनमत करणारे होते. वाळू विरोधात मी लढा दिला. या लढ्याला बळ देणारे अधिकारी हवे होते. परंतू ते मिळाले नाहीत. तहसीलदारांच्या तक्रारी पालकमंत्र्यांकडे केल्या. पण त्यांनी कधीच गांभीर्याने घेतले नाही. शहराच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस निरीक्षक, तहसीलदार आणि बीडीओ हे चांगले असावेत. म्हणजे जनतेची कामे पूर्ण होतात. पण छोटीशी मागणीही पूर्ण होणार नसेल तर आपण त्या पदावर राहण्यात काय अर्थ? लोकसभेच्या आगोदर काही गोष्टी मी सांगितल्या होत्या. ज्या लोकसभेला फायद्याच्या ठरल्या असत्या. परंतु त्यावरही पक्षश्रेष्ठींकडून विचार झाला नाही, अशी खंत देखील आ. लक्ष्मण पवार यांनी बोलून दाखवली.