MUSHAKRAJ

बीड

तुतारीचा आवाज कुठून सुरू झाला?

By Balaji Margude

September 13, 2024

बाप्पांना घेऊन मुषक आज गेवराईच्या दौर्‍यावर होते. आल्या आल्या त्यांनी आपली बहीण गौराईचे दर्शन घेतले. तब्येत बरी नसल्याने बाप्पा कुणालाही प्रत्यक्ष भेटणार नव्हते. गेवराईच्या रेस्ट हाऊसमध्ये त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला होता. सगळी खबरबात कळावी म्हणून मुषकाने त्यांना बीडचे अनेक वर्तमानपत्रं वाचायला दिले. त्यात ठळकपणे एका प्रेप्रात ‘लक्ष्मणरेषा ओलांडून गेवराई तुतारीच्या मोहात’ असे हेडिंग दिसले. बाप्पांनी मुषकाला प्रश्न केला. “जा जरा जाऊन बघा लखनरावांचे नेमके काय सुरू आहे” मुषकाने उत्तर दिले. “त्या पेपरच्या हेडिंगवर जावू नका. त्येंना ड्यॅमेज करण्याची त्यांच्या इरोधकांची ही चाल है. भाजपची दुसरी शाखा असलेल्या संघावाल्यांनी पण त्यांना हापीसाची रंगरंगोटी करायचे फर्मान सोडले व्हते. त्यामुळं तात्पुरता मोदी-शांचा फुटू खाली काढला. बरेच दिवस झाले लखनराव ह्या हापीसात आले नसल्याने कमळावर पण चिखल साचून र्‍ह्यायला व्हता. तिकडं आंतरवालीत मागच्या वर्षीपासून आरक्षणाचा जो हुर्सूळा उठलाय त्येची त्येंनी लैच धास्ती घेतलीय. दोन्दा त्येंच्या घराव आंतरवालीच्या लोकांचा मोर्चा धडकला व्हता. म्हणून लोकसभेत मोठ्या तैयीच्या प्रचाराला पण ते दिसले नैत. त्यामुळं तैयी नाराज असल्याची आतल्या गोटातली न्यूज है. पण लखनराव तैयीला अजिबात जुमानत नैत. त्येंचं थेट कनेक्शन ‘सागर’ बंगल्यावर है”मुषकाची ही मुद्देसूद माहिती ऐकून बाप्पांनी मुषकाचे कान टोचले. म्हण्ले “मुषकराव नीट खबर ठेवीत जावा. आम्हाला कळलेली न्यूज अशी है की लखनरावची तब्येत बरी नस्तीयं. त्यामुळं यंदा त्येंनी थांबायचा निर्णय घेतलाय म्हणं.”बाप्पाच्या प्रश्नाला उत्तर देताना मुषक बोलू लागले. “तुमची खबर 50 टक्के खरी हाय. त्येंची प्रकृती ठिक नस्तीय हे खरं हाय. पण ते यंदा थांबणार हाईत यात काय तथ्य नै. राजकारणात उतरलेला माणूस कै पण केलं तरी थांबत नस्तोय. यंदाच्या बारी त्येंना नाय जमलं तर भाभी खड्या व्हणार हैत”बाप्पांनी पुन्हा सवाल केला “मग ही तुतारीचा आवाज कुठून सुरू झाला?” मुषकाने पुन्हा स्पष्टीकरण दिले. “त्येंनी तुतारीचा आवाज केला नाय तर कमळावाले त्येंना जवळ करीत नाय. ह्येला इलेक्शन स्टॅटर्जी म्हण्तेत. तुतारी म्हण्लं की अलमोन्डसराव (बदामचे इंग्रजी नाव) आबाच्या तंबूत खळबळ व्हतीया. कारण अलमोन्डस आबा मशाल घेऊन बस्लेत. पण आबाच्या मशालीत तेल पडण्याची उल्सीकबी शक्यता दिसत नै. कारण ते तुतारीवाले हिथली जागा सोडण्याच्या मूडमध्ये नैत.मुषकाला मध्येच थांबवत बाप्पांनी पुन्हा प्रश्न केला. हिथं तर तुतारीला कोण बी माणूस नाय म्हणं”.“व्हय तुमचं म्हणंण खरं है. हिथं तुतारीला कोणबी माणूस नै, कौन बाईपण नै. पण हिथं एक पोरगी हाय. ती पोरगी थेट मोठ्या सायबांचा आशीर्वाद घेऊन आली हाय. पोरगी तशी लै डेंजर हाय. इरोधकांना जशाच तसं अ‍ॅन्सर देण्यात ही पोरगी पटाईत हाय. त्येचा अनुभव गेवराईच्या बड्या बड्या नेत्यांनी घेतलाय. त्यामुळं तिला आता सगळेच टरकून अस्त्यात. गरीबाच्या लेकरानं आमदार होऊ नये का? अस्सा जो आंतरवालीतून आवाज येतो त्येच्यात ही पोरगी लै फिट बस्तीया. मराठा क्रांती मोर्चाचा उगम झाला तिथून ही पोरगी आरक्षण चळवळीत सक्रीय हाय. पुढं शेतकर्‍यांच्या प्रश्नावरबी तिनं मोठं काम केलंय. मागच्या बारचे शीएम असलेले अन् आता उप असलेल्या मामूचा जालन्यात ह्या पोरीनं ताफाच अडविला व्हता. तवापास्नं मोठे पवार सायेब या पोरीला धुंडाळीत व्हते” मुषकानं सगळं एका दमात सांगून टाकलं.पण त्या बारक्या पंडितांचं काय चालुये बाप्पांनी पुन्हा प्रश्न केला. “बारक्या पंडिताचं सध्या तरी जोरात सुरू है. लोकसभेला मोठ्या तैयीसायेबांचं काम केल्यानं ओबीसी समाज उल्साक जवळ आल्याचं दिस्तंय. कोण्त्या पक्षाचं लेबल न लावता सध्या त्येंन्च संपर्क अभियान सुरू असल्यानं लोक त्येंना जम्त्याती. आंतरवालीसोबत त्येंनी चांगलंच जमवून घेतल्याचं दिस्तंय. त्येंन्ची मनातून इच्छाय की एकदा सगळेंच पंडितं, सगळेच पवार अन् गेवराईत्ल्या सगळ्या मचळ्यांना उभं र्‍हाऊद्या. शीट मात्र आपणच काढू, असा दांडगा आत्मविश्वास है त्येंना. निवडणुका आल्या की ते अनेक ग्रामपंचायतीला खिंडार, भगदाड पाडत्येत. मागच्या धा-बारा सालात एकपण ग्रामपंचायत बिना खिंडारची अन् बिना भगदाडाची र्‍हायली नसेल. फक्त मतदानांच्या टायमाला मतं कोण्या खिंडारातून अन् भगदाडातून दुसरीकडं जात्यात ते बारक्या पंडितांना अजून पण कळले नै.”मुषकानं सगळाच गेवराईचा चिठ्ठा बाप्पांपुढे खोलल्यानंतर गेवराईची एकूण परिस्थिती बाप्पांच्या ध्यानात आली. बाप्पा आता बीडकडं निघणार तेव्हढ्यात धैहंडी फोडणारे कार्यकर्ते आले आणि बाप्पांना आपलं गार्‍हाणे सांगू लागले. “धैहंडीच्या कार्यक्रमात बक्षीसाची रक्कम म्यॅनेज करून आमच्या भावनांची ‘धोंडराई’ केली” असल्याची तक्रार हे कार्यकर्ते करीत व्हते. “जन्तेंचा इश्वास बसायला लै दिस जात्यात पण तुटायला एक पण घटना पुरेशी अस्ते” म्हणत बाप्पांनी या तरूण नेतृत्वाबद्दल चिंता व्यक्त केली.