mushak

“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”

बीड

बाप्पांचा आज निरोप समारंभ होता. निरोपात काहीच कमी रहायला नको म्हणत अख्खं बीड आज झटताना दिसत होते. निरोपाच्या तयारीचा पूर्व आढावा घेण्यासाठी मुषक निघाले. त्याला दिसले. कलेक्टरांच्या दारात इलेक्शन फंडातून नऊ कोटीचा जंगी मांडव घातला गेलेला होता. कलेक्टर साहेब स्वतःच्या हातांनी मांडवाच्या छताला हंड्या झुंबर्‍या लटकवत होते. सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढौव्ळे, भाई मवन गुंड, भाई अ‍ॅड.नारायण गोळे हे केळीच्या खुटाच्या कमानी उभ्या करत होते. मनोज जाधव, रामनाथ खोड हे रंगीत कागदाच्या झिरमाळ्या चिटकावत होते. केके वडमारे खुर्च्यावर खुर्च्या मांडून आंब्याच्या पानाची तोरणं बांधत होते. त्यांचा कल जावू नये सासाठी मैबूब शेख त्यांना हातांनी टेकन देवून उभे होते. आलेल्या लोकांचे फोटो काढण्यासाठी सुहास पाटलांच्या गळ्यात कॅमेरा देण्यात आला होता. प्रीतमतैयींनी मांडवाच्या दारात दिल्लीच्या मोदीशेठनं पाळलेल्या गोमातेचं शेण वापरून सडा घातला होता. त्यावर पंकजातैयींनी कमळाच्या फुलांची रांगोळी काढली. त्यात केजच्या नमितातैयींनी रंग भरले. त्येंनी कमळ काढलं म्हणून पुजातैयी मोरेंनी तुतारीवाल्या माणसाची रांगोळी काढली. तुतारी काढली म्हणून संगीतातैयी चव्हाण यांनी धनुष्यबाण काढला. मग सारिकातैयी आल्या, माजलगावच्या पल्लवीतैयी आल्या दोघींनी मिळून गुलाबी रांगुळीचा गालीचा तयार तरीत त्यावर पांढर्‍या रांगोळीनं घड्याळ काढली. ‘आमचा पंजा कसा काय नाही’ म्हणत खा. रजनीताईनी डोईचा पदर बाजूला सारत हाताचा पंजा काढला, अन्  त्याखाली आज ‘सोनियाचा दिन’ असे लिहीले.

आष्टीच्या सुरेशान्नांनी पिंजर्‍यात कैद केलेले शिराळा अन् रुईनालकोलचे दोन बिबटे अन् त्यावर निशाणा धरून बसलेले ते स्वतःच, असा देखावा तयार केला होता. मुषकाने या देखाव्याच्या जवळ येत यात सुधारणा करीत बाजुलाच एक तलाठी देवस्थानचे सातबारे लिहीत असल्याचं चित्र उभं करून दिलं.

गेवराईच्या पंडितांनी कमळावर बसलेली सरस्वती तिच्या बाजुलाच शिवछत्राच्या तेलातून जळत असलेली मशाल, अन् घड्याळात नेमके किती वाजले हे पाहत असतानाची देवीची भावमुद्रा असा देखावा लावला होता. मुषकानं हा देखावा पाहून यातही सुधारणा केली. सगळ्यात ज्येष्ठ पंडित, त्यांच्या बाजुला थोरले, मधवे आणि धाकटे पंडित दाखवून अख्खा कुटुंब कबीला उभा केला. अन् या चित्राच्या खाली लहिले ‘घर सलामत तो पगडी पचास’

मुषक पुढच्या देखाव्याकडे वळले. बीडच्या तिन्ही क्षीरसागरांची आदल्या रात्रीच बैठक बसली होती. उद्याचा देखावा काय यावर त्यांची बरीच चर्चा झडल्यानंतर अशोकस्तंभावर ज्याप्रमाणे तिन्ही बाजुनी सिंह दिसतात तशा पोजमध्ये तीन्ही क्षीरसागर सिंहाच्या मुद्रेत उभे राहतील असे ठरले. त्याप्रमाणे सिंहाची राजमुद्रा असलेला त्यांचा देखावा लावण्यात आला होता. मुषकाने यातही अ‍ॅडशीनल सुधारणा केली. लाकूड तोड्याच्या गोष्टीतील लोकूडतोड्या अन् प्रसन्न झालेल्या देवाचं चित्र साकारलं. त्यात लाकूड तोड्याला बक्षीस म्हणून दिलेल्या तिन्ही कुर्‍हाडी. दाखवल्या. शिवाय त्या तिन्ही कुर्‍हाडींवर नगराध्यक्ष, आमदार, खासदार असे लिहून त्या परत लाकुडतोड्याला बक्षीस म्हणून दिल्याचे दाखविले. शिवाय याच चित्राखाली लिहीले “एकमेकांच्या पाठीला पाठ देवून उभे र्‍हायलात तर सगळ्या कुर्‍हाडी तुमच्याच” असा संदेश लिहीला.

माजलगावचा देखावा काय लावायचा यावर सोळंक्यांच्या घरात एकमत होत नव्हते. त्यामुळे ही जबाबदारी आंतरवालीच्या पोरांवर येऊन ठेपली. त्यांनी एक तुरूंग तयार केला अन् आत आंतरवालीच्या पोरांचा पाच महिने कसा छळ झाला याचा जिवंत देखावा तयार केला. हा देखावा पाहून मुषकाने त्यात खाली एक स्लोगन लिहीले, पोरांनो, ‘तुम्हारा वक्त अब आ गया’
केजचा देखावा लावण्याची जबाबदारी याबारी खा. जबरंगबप्पांनी घेतली. त्यांनी एका बाजुला बीडचा नकाशा तर दुसर्‍या बाजुला दिल्लीचं संसद भवन दाखविलं. अन् या दोहोंना जोडण्यासाठी बीडच्या नकाशावर एक विमानतळ काढून तिथून उड्डाण घेतलेलं विमान अन् ते दिल्लीच्या संसद भवनात कसं उतरविता येईल याचं कल्पना चित्र तयार केलं होतं. हा देखावा पाहील्यानंतर मुषकाने त्याच चित्रात एका बाजुला रेल्वेची वाट बघत असलेले बीडकर, एसटीची वाट बघत असलेली काही शाळकरी मुलं दाखवली.

आता सगळ्यांना उत्सुकता होती परळीच्या देखाव्याची. बाल्मीकान्नांनी एक लोकशाहीचं चित्र काढून त्यावर 78000 आकड्याला टार्गेट हिटचा लोगो लावला होता. बाजुलाच एका रांगेत मतदारांच्या बोटाला शाई लावण्याचं काम सुरू होतं. त्याच चित्रात पोलीस स्पष्ट दिसत होते. मुषकाने या चित्राखाली ‘बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो’ अशी गांधीची तीन माकडं असलेलं चित्र रेखाटलं.

आता जिल्हा परिषदेनं देखील आपला देखावा तयार करून आणला होता. त्यात जलजीवनच्या पाईपलाईनमधून नागरिकांना थेंब थेंब पाणी नळाद्वारे कसं मिळत होतं हे दाखविण्यात आलं. दुसर्‍या बाजुला सीईओ असलेल्या संगीतादेवी पाटील यांच्या टेबलावर सहीवाचून पडून असलेल्या फाईलींचा ढिगारा दिसत होता. मुषकाने चित्राच्या जवळ जात सीईओ बसलेल्या खुर्चीच्या मागे ‘कामाला कधीमधी पण पगारीला सगळ्यात आधी. कारण मी आहे प्रभारी’ असं स्लोगन लिहीलं.

बीड नगर पालीकेच्या सीओ नीता अंधारेंनी स्वच्छ बीड, सुंदर बीडच्या धरतीवर थीम तयार केली होती. त्यावर मुषकाने स्वच्छ बीडच्या खाली खळखळून हसणारी एक स्माईली टाकली.
सगळ्यांचं पाहून इकडे जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील देखावा तयार केला. कलेक्टर सायेबांची बीड-परळी, बीड-गेवराई आणि बीड-आष्टी, बीड-माजलगाव होत असलेली धावपळ त्यात मांडली होती. मुषकाने त्याखाली लिहीले, “एकाच जिल्ह्यात अख्खी हयात काढायची म्हटल्यावर सालकर्‍यासारखी फिलींग येणारच की”
आता शेवटचा देखावा जिल्हा पोलीस दलाचा होता. बँकेच्या गुन्ह्यातील अनेक बड्या आरोपींना आम्ही बेड्या ठोकल्या असा दावा त्यात करण्यात आला होता. मुषकाने तिथेही एक सवाल लिहीला. “सगळं खरंय पण अर्चना कुटे कुठंयत?”

तितक्यात कोणीतरी म्हटलं मी आज सगळ्या बीडला दोनशे क्विंटलची खिचडी शिजवून खाऊ घालतो. लगेच खिचडी शिजायला घातली. रस्त्यावर जेवणाच्या पंक्ती उठू लागल्या. बाप्पांच्या निरोपाची वेळ झाली. वाजवा म्हणायचा अवकाश बँडवाले तयारच होते. मुषकाने बाप्पांना मुख्य मंडपात आणले. बीडकर करामती आहेत हे बाप्पांना माहिती होतेच. ते आंतर्यामी असल्याने कुठे काय चालले हे त्यांना पुरते ठाऊक होते. बाप्पा मंडपात आल्या आल्या मुषकाने खिचडी देणार्‍या दात्याची ओळख करून दिली. अन् कानात सांगितले. कुठल्याही कार्यक्रमाला पट्टी द्यायची म्हणलं की हे दाते 200 क्विंटलची खिचडी शिजवतो म्हणतात. अन् फक्त 2 क्विंटलचीच खिचडी बनवतात. बाप्पानं त्यांच्याकडे कटाक्ष टाकला अन् पुढे निघाले. तसा बॅन्ड वाजू लागला. अख्खं बीड आता बाप्पांना निरोप द्यायला आले. अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. हजार माणसं जमा होणार तिथे लाखो माणसं जमली. बायकांची संख्या लक्षणीय वाढली. जड पावलानी नाचणार्‍या पोरांची तर गिणती नव्हती. जिल्ह्यातले सारे आमदार आले, माजी आमदार आले. बाप्पांची मिरवणूक कंकालेश्वराच्या कुंडाजवळ आली. सगळ्यांनी मनोभावे विसर्जनाची आरती केली. धन्नुभौंनी एक जोराची एक घोषणा दिली “गणपती बाप्पा मोरया”, त्यावर सगळी जनता म्हणाली “पुढच्या वर्षी लवकर या”
समाप्त…

– बालाजी मारगुडे, बीड
मुषकराज पर्व 5 वे भाग 11
(मुषकराज सदर आपल्याला कसे वाटले? यावरील आपल्या प्रतिक्रीया 9404350898 यावर व्हॉटसअ‍ॅप करा)
———–

Tagged