pankaja munde bajarang sonwane.JPG

बीड

खा.बजरंग सोनवणे यांना खंडपीठाची नोटीस

By Balaji Margude

September 27, 2024

खासदार म्हणून झालेली निवड रद्द करण्याची याचिकेत मागणी

छत्रपती संभाजीनगर : बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, नारायण शिरसाट यांनी ॲड. शशिकांत ई शेकडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर 27 सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती ए.एस.वाघवसे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात प्रतिवादी बजरंग सोनवणे यांना चार आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले.

अधिक माहिती अशी की, बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा लोकसभेत 6553 मतांनी पराभव केला होता. बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेली होती. प्रतिवादी बजरंग सोनवणे यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आलेली आहे. दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की काही मतदान केंद्रावरील मतांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. तसेच पोलिंग बूथ केंद्रांची संख्या वाढवताना राजपत्रानुसार प्रसिद्ध करणे गरजेचे असताना सुद्धा निवडणुकीच्या ऐन तीन दिवस अगोदर पोलिंग बुथ केंद्र वाढवलेले असून त्यामुळे ४२६१ लोक मतदानापासून वंचित राहिलेले आहेत. ते बुथ कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर आहेत तसेच सदरील पोलिंग बुथचे मतदान हे मतमोजणी करताना मोजता येणार नाही. ते मतदान हे अवैध असून त्याच्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे. माजलगाव शहरांमधील बूथ क्रमांक ६८ केंद्रावरील ईव्हीएम मशीनमधील घोळामुळे ७७४ मतदान हे मोजण्यात आलेले नाही. व वैध असणारे ११५६ पोस्टल मतदान हे बेकायदेशीरपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केलेले आहेत. तसेच निवडणूक निर्णय घोषित करताना 909 मतांचा फरक आढळून येत आहे. हे सर्व सर्व मतदान निवडणुकीच्या निकालावर परिणामकारक ठरणारे आहे. तसेच प्रतिवादी बजरंग सोनवणे नामनिर्देशन फॉर्म भरताना शपथपत्रात खोटी माहिती पुरवलेली आहे. या आदी मुद्द्यावर खंडपीठाने याचिका दाखल करून घेतलेली आहे . व प्रतिवादींना चार आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. तर याचीकाकर्त्याच्या वतीने ॲड शशिकांत ई. शेकडे यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. पृथ्वीराज ए. ढाकणे, ॲड. बी. एस. बोडखे ,ॲड. विशाल थावरे, ॲड.आर.जी.नरवडे व एन.एस. राठोड यांनी सहकार्य केले.

उत्पन्नाचे स्त्रोत फक्त शेती आणि दुग्ध व्यवसायबजरंग सोनवणे यांनी आपल्या उत्पन्नाचा सोर्स शेती आणि दुग्ध व्यवसाय असल्याचे निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथ पत्रात नमूद केले आहे. शेती आणि दुग्ध व्यवसाय असताना त्यांनी दाखवलेली संपत्ती मात्र 200 कोटी रुपयांच्या पुढे आहे. ते येडेश्वरी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर असताना त्यांनी शपथ पत्रात तसा उल्लेख केला नाही. त्यामुळे यावर देखील याचिकेतून आक्षेप घेण्यात आला आहे.

एकूण झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यात फरक

बीडमध्ये मतदानाच्या दोन दिवस अगोदर बूथ क्रमांक 86 ए, 130 ए, 139 ए,140 ए, 170 ए, 190 ए, 12 ए असे एकूण 7 बूथ अचानक वाढविण्यात आले. त्यामुळे 4261 मतदारांना मतदान करता आले नाही. तर माजलगाव मधील बूथ क्रमांक 68 वरील 774 मतदान मोजण्यात आलेलं नाही. याशिवाय वैध असलेले पोस्टल मतदानात एकूण 1156 मतदान बाद करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने एकूण झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजले गेलेले मतदान यांच्यात जवळपास 909 मतांचा फरक असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.