बालाजी मारगुडे । बीडदि.18 : आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड न करणार्या बाणेदार स्वभावाच्या तरुण, तडफदार महिला आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी आपली कारकीर्द अवघ्या नवव्या वर्षात एका उंचीवर नेऊन ठेवली. ज्यामुळे सर्वसमान्य माणसाला केवळ न्याय नाही, तर हक्काचे पैसे मिळाले. ‘खाकी वर्दीत एक सामान्य स्त्री ते रणरागिणी’ असेच त्यांचे रूप दिसले. बीएचआर घोटाळा, आरोग्य भरती पेपरफुटी ते बिटकॉइन गुन्ह्याचा तपास त्यांनी केला. बड्या राजकीय नेतेमंडळींसमोर न झुकता घोटाळेबाजांना बेड्या ठोकल्या. त्यामुळे राजकीय महायुतीच्या नेत्यांकडून आता आयपीएस भाग्यश्री नवटके यांना टार्गेट करण्यात आले असून त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची आता सीबीआयकरवी चौकशी होणार आहे.मागील काही दिवसांपासून भाग्यश्री नवटके चर्चेत आहेत. जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी सुनील झंवर तसेच कुणाल शहा यांनी पोलिस महासंचालकांकडे दिलेल्या तक्रार अर्जावरून पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील तत्कालीन पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्याविरुद्ध पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेशाने संगणक अभियंता असलेल्या भाग्यश्री नवटके 2015 बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी. एक पाऊल पाठीमागे घेत त्यांनी जर पडद्यामागे शरणागती पत्कारली असती, तर ही वेळ नवटके यांच्यावर आली नसती. इतरांप्रमाणे त्यांनी नेत्यांच्या दबावापुढे सरेंडर होत त्यांना हवे तसे जबाब दिले असते, तर ही वेळ नक्कीच नवटके यांच्यावर आली नसती. पुणे शहर पोलिस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असताना नवटके यांनी गुन्ह्यांचा तपास करून सर्वसामान्य गुंतवणूकदारांची जमापुंजी परत मिळवून दिली. त्यामध्ये एका बड्या राजकीय व्यक्तीच्या हस्तकाला त्यांनी बेड्या ठोकल्या, तर दुसर्या गुन्ह्यात पोलिस दलातीलच ‘सर्वोच्च’ पदावरील मॅडमसाहेबांच्या निकटवर्तीयाला बिटकॉइनच्या गुन्ह्यात गजाआड केले. हे महाशय मॅडमसाहेबांच्या खास मर्जीतले. त्यांना बेड्या ठोकताच मॅडमसाहेबांनी नवटके यांना खास इशारा दिला होता.पुढे झालेही तसेच. पुण्यात गुन्हा नोंद झालाच पण मॅडमसाहेब तेवढ्यावर समाधान मानणार्या नव्हत्या. त्यांनी सीबीआय करवी पुन्हा एक गुन्हा नोंद करून घेतला. एक गोष्ट मात्र यामध्ये निदर्शनास येते. नवटके यांनी या तिन्ही प्रकरणांत चुकीचे काहीच कधी केले नाही. मात्र, तरी देखील काही लोकांचा इगो दुखावल्यामुळे नवटके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तो देखील आरोपींच्या तक्रारीवरून. बीएचआर या प्रकरणाची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्यात आली होती. जर यामध्ये गैरप्रकार आढळला असता, तर सीआयडीने याबाबत तक्रार देऊन गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. नवटके यांची खात्यांतर्गत चौकशी झाली नाही. सुरुवातीला बिटकॉइन प्रकरणात नवटके यांना गुंतविण्याचा प्रयत्न झाला. दहा ओळींच्या एका तक्रार अर्जावरून ही चौकशी सुरू करण्यात आली. अनेक अधिकार्यांवर याबाबत मॅडमसाहेबांचा दबाव होता. काही करून नवटके यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मात्र, जंग-जंग पछाडून देखील नवटके यांच्याबाबत काही हाती लागले नाही. ज्या अधिकार्यांकडे हे काम सोपविण्यात आले त्यांनी नवटके यांच्यासोबत काम केले होते, त्यामुळे त्यांना याबाबत माहिती होती. आम्ही चुकीचे काही करणार नाही, असे त्या अधिकार्यांनी सांगितले. त्यानंतर बीएचआर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. मागील सात ते आठ महिन्यांपूर्वीपासून नवटके यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याची चर्चा होती. पुढे झालेसुद्धा तसेच.
काय आहे बीएचआर प्रकरण?बीएचआर Bhaichand HIrachand Raisoni प्रकरणामध्ये 1 लाख 69 हजार ठेवीदार पीडित असून, ते सुमारे 10-12 वर्षे पैसे मिळण्यासाठी प्रतीक्षा करीत होते. पैसे न मिळाल्याने गरीब कुटुंबांतील मुला-मुलींचे शिक्षण, लग्न थांबले होते. वयोवृद्ध ठेवीदारांच्या आजारपणाच्या उपचारासाठी पैसे मिळत नव्हते. नवटके यांच्या कारवाईमुळे 120 कोटी रुपयांचा परतावा मिळाला आहे. लॉकडाऊनच्या कठीण काळामध्ये फसवणूक झालेल्या शेतकरी ठेवीदारांचे सुमारे 2 कोटी रुपये कर्जदारांनी शेतकर्यांना त्यांच्या बांधावर जाऊन आरटीजीएसद्वारे दिले आहेत. या कारवाईमुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळून दिलासा मिळाला आहे.बीएचआर घोटाळ्यामध्ये संचालक मंडळाच्या कालावधीतील फ्रॉड रक्कम 1200 कोटी होती आणि अवसायकाच्या कालावधीत 167 कोटींचा अपहार उघड झाला. या कारवाईमुळे कर्जदार आरोपींनी कोर्टात पैसे भरले. अशा परिस्थितीमध्ये चांगली कारवाई करणार्या नवटके यांच्यावर गुन्हा दाखल करून झालेली कारवाई ही राजकीय लोकांचे कारनामे उघड होऊ नयेत म्हणून केली असल्याची चर्चा आहे. वास्तविक, ही संस्था समाजातील धनदांडग्या लोकांनी गरिबांचे पैसे लुटून खाल्ली होती. त्या लोकांना नवटके यांनी आपल्या कार्यकाळात न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाशधनधांडग्या लोकांकडून पैशाच्या जोरावर सरकारी नोकर्या मिळविल्या जात होत्या. त्यासाठी आरोपींनी थेट पेपर फोडण्यास सुरुवात केली होती. आयपीएस भाग्यश्री नवटके यांनी या रॅकेटचा पर्दाफाश करून अनेकांना गजाआड केले. त्यांनी खर्या अर्थाने गरीब घरातील तरुणांना दिलासा मिळवून देला. परंतु ही कारवाई देखील राजकीय मंडळींना रुचली नाही. त्यांनी ऐनकेन प्रकारे आयपीएस भाग्यश्री नवटके यांच्यावर दबाव आणण्यास सुरूवात केली. ही कारवाई थांबवावी म्हणून त्यांच्यावर सीबीआय सारखी यंत्रणा मागे लावण्याची त्यावेळी वारंवार धमकी दिली जायची. परंतु तरीही नवटके यांनी पेपरफुटीची पाळेमुळे खणून काढली होती.
नेमके काय आहे पेपरफुटीचे प्रकरण…नोव्हेंबर 2021 मध्ये आरोग्य विभागाच्या पदभरतीसंदर्भात परीक्षेपूर्वी पेपर व्हॉट्सपवर प्रसारित झाल्याची माहिती नवटके यांना मिळाली होती. त्यावेळी त्या पोलिस आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे पुणे शहर म्हणून कार्यरत होत्या. माहितीचे गांभीर्य पाहून त्यांनी तत्काळ पडताळणी केली असता परीक्षेपूर्वी पेपर फुटल्याचे निष्पन्न झाले. याबाबत सायबर पोलिस स्टेशन येथे सीआर क्रमांक 53/2021 आणि 59/2021 दाखल झाले आणि पेपर फोडणार्या आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे, सहसंचालक आरोग्य विभाग महेश बोटले, अशा वरिष्ठ अधिकार्यांसह एजंट, क्लासचालक असे अनेक आरोपी गजाआड गेले. पोलिसांनी कार्यक्षमता आणि विश्वासार्हता सिद्ध केल्याने त्याच वेळी नवटके यांना म्हाडा विभागाचा पदभरतीचा पेपर फुटणार असल्याची गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाली. त्याबाबत देखील सायबर पोलिस स्टेशन पुणे शहर येथे 55/2021 क्रमांकाने गुन्हा दाखल आहे. नवटकेंच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सापळा रचून म्हाडाची परीक्षा आयोजित करणार्या जी. ए. सॉफ्टवेअर नावाच्या कंपनीचे ड़ायरेक्टर प्रीतेश देशमुख व एजंट यांना प्रश्नपत्रिकांसह ताब्यात घेतले. पुढे शासनाला ही परीक्षा रद्द करावी लागली. म्हाडा पदभरती दुसर्या संस्थेस देऊन अधिक पारदर्शीपणे परीक्षा घेण्यात आली. या गुन्ह्यामध्ये पदभरती घेणार्या कंपनीच्या अधिकार्यांसह अनेक एजंट, अशा 15 पेक्षा जास्त आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले.म्हाडा पदभरती गुन्ह्याच्या तपासादरम्यान त्याच आरोपींनी टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) परीक्षामध्ये घोटाळा करून पैसे घेऊन अपात्र विद्यार्थी पात्र केल्याची माहिती मिळाली. याबाबत देखील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवटके यांनी टीईटी परीक्षेमध्ये सुमारे 16 हजार पात्र विद्यार्थ्यांपैकी 7800 अपात्र विद्यार्थ्यांना पैसे घेऊन पात्र केल्याचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे निष्पन्न केले. या शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर, परीक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम सुपे, परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे, जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष के. अश्विन व प्रितेश देशमुख, शिक्षण संचालक यांचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, इतर संबंधित लोक आणि एजंट, अशा 25 पेक्षा जास्त आरोपींना गुन्ह्यात अटक करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. एवढेच नाही, तर गुन्ह्यातील आऱोपींकडून त्यांनी गुन्ह्यातून कमविलेले करोडो रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात डेटा विश्लेषण करून पैसे घेऊन पात्र केलेले विद्यार्थी निष्पन्न केले व सदर अपात्र विद्यार्थ्यांची नावे शिक्षण विभागास कळविल्याने शिक्षण विभागाने त्या सर्व विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षेत व नोकरीत देखील अपात्र केले. शिक्षण परिषदेने परीक्षापद्धतीत मोठे फेरबदल केले व पारदर्शकता निर्माण केली.नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व म्हाडा विभागाच्या परीक्षा घोटाळ्यासंदर्भात पाच गुन्ह्यांचा तपास केला. अनेक उच्च पदस्थ अधिकारी, एजंटना अटक करून महाराष्ट्रातील नियोजनबद्ध पद्धतीने पेपर फोडणार्या यंत्रणेस खिंडार पाडले. परीक्षा पेपर फोडणार्या सराईत गुन्हेगारांना चाप बसविला. वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या व नोकरीसाठी झगडणार्या सामान्य सुशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये नवी उमेद जागृत केली. प्रशासनावरचा व पोलिस खात्यावरचा जनतेचा विश्वास वृद्धिंगत केला.
काय आहे बिटकॉइन प्रकरण?दिल्लीच्या भारद्वाज बंधूंनी देश-विदेशातील गुंतवणूकदारांना अवाजवी परताव्याचे आमिष दाखवून लाखो बिटकॉइनच्या केलेल्या अपहाराबाबत देशभरात दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांपैकी दोन गुन्ह्यांचा तपास 2018-19 मध्ये पुण्याच्या सायबर पोलीस पोलिसांनी केला होता. त्या वेळी पोलिसांकडे तांत्रिक ज्ञान नसल्याने सदर गुन्ह्याच्या तपासात दोन तांत्रिक तज्ज्ञांची नेमणूक केली होती. या दोन तांत्रिक तज्ज्ञांपैकी एक तांत्रिक तज्ज्ञ हे स्वेच्छा निवृत्ती घेतलेला आयपीएस अधिकारी व नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत डायरेक्टर होते. तर, दुसरे अतिवरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या गळ्यातील ताईत होते.गुन्ह्याच्या तपासासादरम्यान तांत्रिक तज्ज्ञांनी बिटकॉइनचा अपहार केल्याच्या अनेक तक्रारी सन 2020 मध्ये गुंतवणूकदारांनी अपर पोलिस महासंचालक, आर्थिक गुन्हे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी त्यासंबंधी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सन2021 मध्ये ही चौकशी आयपीएस भाग्यश्री नवटके यांच्याकडे देण्यात आली. या चौकशीमध्ये बिटकॉइन व ब्लॉकचेन तंत्रज्ञान नवटके ह्या स्वत: कॉम्प्युटर इंजिनिअर असल्याने त्यांनी स्वत: आत्मसात केले, त्याचा अभ्यास केला. या गुन्ह्यांतील रिकव्हरी प्रक्रियेचा व त्यामध्ये समाविष्ट तांत्रिक बाबींचा अभ्यास करून तांत्रिक बाबींच्या तपासाचे कौशल्य प्राप्त केले. त्यानंतर या चौकशीमध्ये तांत्रिक तज्ज्ञांनी गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना मदत करीत असताना बिटकॉइनचा अपहार केल्याचे तसेच हा अपहार लपविण्यासाठी बनावट स्क्रीनशॉट पोलिसांना सादर केल्याचे निष्पन्न केले. या चौकशीवरून सायबर पोलिस स्टेशन, पुणे शहर येथे तांत्रिक तज्ज्ञांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नवटके यांनी या गुह्याच्या तपासात तांत्रिक तज्ज्ञ पंकज घोडे व रवींद्रनाथ पाटील यांना अटक केली. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींकडून त्यांनी अपहारातून कमविलेली करोडो रुपयांची विविध प्रकारची क्रिप्टो करन्सी जप्त केली. तसेच तपासादरम्यान तांत्रिक तज्ज्ञांनी हजारो बिटकॉइनचा अपहार केल्यासंबंधीचे क्रिप्टो करन्सीसंदर्भातील सबळ तांत्रिक पुरावे प्राप्त करून दोन्ही तांत्रिक तज्ज्ञांविरोधात न्यायालयात सक्षम दोषारोपपत्र दाखल केले.या गुन्ह्याची उकल करून आऱोपींना अटक केल्यामुळे आम्ही क्रिप्टो करन्सीमध्ये अपहार करून त्याची विविध मनिलाँड्रिंगच्या पद्धती वापरून विल्हेवाट लावल्यास आम्हाला कोणीही पकडू शकणार नाही, असा तांत्रिक तज्ज्ञांचा अतिआत्मविश्वास खोटा ठरला व क्रिप्टो करन्सीद्वारे करण्यात येणार्या गुन्ह्यांचाही आपण यशस्वीरीत्या तपास करू शकतो, असा आत्मविश्वास पोलिस दलामध्ये निर्माण झाला. या गुन्ह्याचा तपास हा क्रिप्टो करन्सीसंबंधी गुन्ह्यांच्या तपासांमध्ये भारतातील एक मैलाचा दगड आहे. महाराष्ट्र व इतर राज्यातील पोलिस दलांना आजही हा तपास मार्गदर्शक ठरत आहे. याच गुन्ह्यात पोलीस दलातील अति वरिष्ठ अधिकारी गुंतले असल्याने त्यांनी हा तपास थांबविण्यासाठी खूप प्रयत्न केले. नंतरच्या काळात राज्यात सरकार कोसळले. त्यानंतर क्रिप्टो करन्सीच्या गुन्ह्यातील आपला सहभाग उघडकीस येऊ नये म्हणून आयपीएस भाग्यश्री नवटके यांची पुण्याच्या सायबर विभागातून चंद्रपूरला बदली करण्यात आली. आता याच प्रकरणाचा हिशोब पूर्ण करण्यासाठी आयपीएस भाग्यश्री नवटके यांना सीबीआयच्या चौकशीच्या फेर्यात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे.